
मुंबईत धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमावेळी अंनिस कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटिसा रद्द!
धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा मुंबई मिरा रोड येथे १८ व १९ मार्च रोजी झालेल्या दिव्य दर्शन कार्यक्रम झाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कार्यक्रमाला विरोध केला होता. त्यासंबंधी पोलिसांना निवेदन देखील देण्यात आले होते.
धीरेंद्र शास्त्री महाराज हे अंधश्रद्धा पसरवतात आणि चमत्काराचा दावा करतात, असा आरोप अंनिसने केला होता. तसेच धीरेंद्र शास्त्री हे संत समाजसुधारकांचा अवमान करणारे भाष्य करतात, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम रद्द करुन कारवाई करण्याची मागणी अंनिसने केली होती.
मात्र या उलट मीरा रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी धिरेंद्र शास्त्रीवर कारवाई करण्याऐवजी महाराष्ट्र अंनिसने कार्यक्रमात धरणे, निदर्शने, आंदोलन करू नये म्हणून कलम १४९ अंतर्गत अंनिसचे राज्य प्रधानसचिव नंदकिशोर तळाशीलकर आणि अन्य कार्यकर्त्यांना नोटीस दिली. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र अंनिसने महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायदयानुसार धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्यावर कारवाई करावी अशी, अशी मागणी केली होती.
अविनाश पाटील म्हणाले, अंनिसने पोलिसांना दिलेल्या निवेदनात कुठेही धरणे आंदोलन करणार असे लिहिलेले नव्हते. तरीही पोलिसांनी कार्यकर्त्यांना चुकीची नोटीस दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून कायदे विभागाच्या सहकार्यवाह अॅड तृप्ती पाटील, वकील निलेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर पाठपुरावा केला.
अंनिस कार्यकर्त्याना दिलेली नोटीस मागे घ्यावी. ती नोटीस देणे चुकीची आहे, असे अंनिसने पोलीस आयुक्तालयांना कळवले होते. त्यानंतर पोलीस उपयुक्तांमार्फत चौकशी होऊन त्या नोटीसा मागे घेण्यात आल्या आहे, असे अविनाश पाटील यांनी सांगितले.