महापरीक्षा पोर्टलला  उमेदवारांचा आक्षेप 

महापरीक्षा पोर्टलला  उमेदवारांचा आक्षेप 

मुंबई - राज्य सरकारच्या महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेबाबत परीक्षार्थींनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत. सरकारचे या परीक्षेवर नियंत्रण नाही. उत्तरपत्रिकेसाठी देण्यात येणारे लॉगइन दोनदा वापरले जात असल्याचा आरोप करून राज्य लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

नगरपालिकांतील विविध पदांच्या भरतीसाठी काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी काही ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये केंद्र तयार करण्यात आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. एका विद्यार्थ्याला मेरिटमध्ये येण्याची खात्री असूनही तो उत्तीर्ण न झाल्याने त्याने उत्तरपत्रिकेची प्रत मागवली होती; मात्र त्याला स्क्रीनशॉट काढून त्याची प्रत देण्यात आल्याचे त्याचे म्हणणे आहे. नगरपालिकेतील भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेत एका उमेदवाराचे लॉगइन दोनदा वापरण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिकेत हवे ते बदल करण्यात आल्याची शक्‍यता उमेदवार करत आहेत, तर औरंगाबाद येथे उमेदवार पेपर सोडवत असताना मोबाईलवर बोलणे सुरू होते, अशा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. 

45 टक्‍क्‍यांची अट घातक 
ऑनलाईन परीक्षेत किमान 45 टक्के गुण मिळाल्यास पुढील प्रक्रियेसाठी उमेदवार पात्र ठरतो. ही अट घातक आहे, असा आक्षेपही उमेदवारांनी घेतला आहे. अभियांत्रिकी पदातील 100 जागा माजी सैनिक आणि काही प्रवर्गांसाठी राखीव होत्या. मात्र टक्‍क्‍यांच्या अटीमुळे ही पदे भरलीच गेलेली नाहीत. 

महापरीक्षा हे सरकारचे पोर्टल आहे. त्यात त्रुटी आढळल्यास वेळीवेळी सुधारणा केल्या जातात. पोर्टलद्वारे व्हीएसटी कंपनीला राज्यात परीक्षा केंद्र देण्यासाठी कंत्राट दिले आहे. त्यामुळे काही गैरसोय होऊ शकते. राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे महापरीक्षा पोर्टलवर पूर्ण लक्ष आहे. तरीही काही त्रुटी असतील तर आम्ही त्यात सुधारणा करू. 
- पी. प्रदीप, संचालक,  माहिती आणि तंत्रज्ञान विभाग. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com