महावितरणात कनिष्ठ अभियंता पदी निवड, पण 6 महिन्यापासून उमेदवारांची नियुक्ती नाही

कार्तिक पुजारी
Tuesday, 28 July 2020

महावितरण सरळसेवा अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदासाठी निवड होऊनही उमेदवारांची जवळपास 6 महिन्यांपासून नियुक्ती झालेली नाही.

मुंबई- महावितरण सरळसेवा अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदासाठी निवड होऊनही उमेदवारांची जवळपास 6 महिन्यांपासून नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे अनेक उमेदवार नियुक्तिच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक उमेदवारांनी या पदासाठी निवड झाल्याने आपली पूर्वीची नोकरी सोडली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असून नियुक्ती कधी होईल याकडे त्यांचे डोळे लागले आहेत.

टाइम कॅप्सुल ठेवणार की नाही? राम मंदिर ट्रस्टच्या सदस्यांमध्ये मतभेद
महावितरण कंपनीतर्फे जाहिरात क्रमांक 06/2019 द्वारे कनिष्ठ अभियंता पद भरतीसाठी परीक्षा दिनांक 13 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल दिनांक 17 जानेवारी 2020 रोजी लागला त्यानंतर कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया नाशिक येथे दिनांक 4 फेब्रुवारी 2020 रोजी पूर्ण झाली. कागदपत्र पडताळणी नंतर साधारणपने फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान नियुक्ती येणे अपेक्षित होते, पण ती मिळाली नाही.

जिल्हा बंदीमुळे निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या जिल्ह्यात तालुक्यात स्थानिक आमदार-खासदारांना, मंत्री यांच्याकडे याविषयी पाठपुरावा केला. परंतु अजूनही कुठलाही प्रतिसाद या उमेदवारांना मिळाला नाही. महावितरण कंपनीच्या दूरध्वनीद्वारे ई-मेलद्वारे संपर्क केला असता समाधानकारक उत्तरे मिळाले नसल्याचे उमेदवार विशाल काटकर याने सांगितलं.

महाराष्ट्रात मुंबई मेट्रो रेल्वे, मुंबई महानगरपालिका, सेंट्रल रेल्वे यांच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी परीक्षा झाल्या होत्या. त्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण करून लॉकडाउन असतानाही ही नियुक्ती पत्रे सर्व उमेदवारांना मिळाली आहे. परंतु महावितरणकडून कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. परीक्षेसाठी अभ्यास करणारे उमेदवार पार्ट टाइम जॉब करून अभ्यासासाठी वेळ काढत असतात तर काही उमेदवार पुर्णवेळ अभ्यास करुन कष्टाने व परिश्रमाने यश मिळवत असतात. साधारणपणे दोन ते तीन वर्षाचा कालावधी अभ्यासासाठी लागत असतो. महावितरणमध्ये निवड झाल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आधीचे जॉब सोडले आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणी तसेच नाहक मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर! 'इथे' पहा तुमचा निकाल
आज रोजी निकाल लागून सहा ते सात महिने होत आहेत. पण नियुक्तीबद्दल कोणतेही परिपत्रक महावितरण प्रशासनाकडून जारी केले गेले नाही. सध्या लॉकडाऊन जिल्हा बंदी असल्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट उमेदवार घेऊ शकत नाही. तरी सर्व उमेदवार ई-मेल, दूरध्वनी, ट्विटर फेसबूक द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही उमेदवारांना कुठलाही प्रतिसाद अद्यापही मिळाला नसल्याचं कळत आहे. त्यामुळे उमेदवार अडचणीत सापडले असून त्यांना त्यांच्या भविष्याचा प्रश्न सतावू लागला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates selected as Junior Engineers in MSEDCL have been waiting for appointment