एमपीएससी निकालाची उमेदवारांना प्रतीक्षाच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१८मध्ये घेण्यात आलेल्या गट-क सेवा परीक्षेतील कर सहायक आणि लिपिक टंकलेखक पदाचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत.

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१८मध्ये घेण्यात आलेल्या गट-क सेवा परीक्षेतील कर सहायक आणि लिपिक टंकलेखक पदाचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. आयोगाच्या वतीने ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षे’ची जाहिरात येत्या काही दिवसांत निघण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे किमान ही जाहिरात निघण्यापूर्वी या पदांचा निकाल जाहीर करावा, असे परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे म्हणणे आहे.

आयोगांतर्गत ‘गट-क सेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात मार्च २०१८मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क, दुय्यम निरीक्षक, कर सहायक आणि लिपिक टंकलेखक या तिन्ही पदांच्या जवळपास नऊशेहून अधिक जागांसाठी जून २०१८मध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. या पूर्वपरीक्षेचा निकाल ऑगस्ट २०१८मध्ये जाहीर करण्यात आला. त्यानंतर मुख्य परीक्षेतील पहिला संयुक्त पेपर ऑक्‍टोबरमध्ये झाला. तर दुसरा संयुक्त पेपर लिपिक टंकलेखकपदासाठी ऑक्‍टोबरमध्ये, दुय्यम निरीक्षक पदासाठी (राज्य उत्पादन शुल्क) नोव्हेंबरमध्ये, कर सहायक पदासाठी डिसेंबर २०१८मध्ये झाला.  या परीक्षेतील तिन्ही पदांपैकी दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदाचा निकाल मार्च २०१९मध्ये जाहीर करण्यात आला. परंतु उर्वरित दोन पदांच्या मुख्य परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने उमेदवार नाराजी व्यक्त करत आहेत. त्यात आयोगाच्या नव्या वेळापत्रकानुसार ‘गट-क सेवा परीक्षा २०१९’ची जाहिरात येत्या काही दिवसांत काढण्यात येईल. ही जाहिरात निघण्यापूर्वी २०१८मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करावा, अशी उमेदवारांची मागणी आहे.

परीक्षेत यशस्वी झालो की नाही, हे निश्‍चित न झाल्याने अनेक उमेदवार २०१९मध्ये होणाऱ्या परीक्षेचा अर्जदेखील भरण्याची शक्‍यता आहे. हा मनस्ताप सहन करावा लागू नये, म्हणून हा निकाल नवीन जाहिरात येण्यापूर्वी जाहीर करावा.
- प्रतीक चवरे

Web Title: Candidates waiting for MPSC results