देशमुखांसह दोन सचिव अन् वाझे केंद्राच्या ताब्यात, CBIचे पथक कारागृहात दाखल|Anil Deshmukh Sachin Waze CBI Custody | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh Sachin Waze CBI Custody

देशमुखांसह दोन सचिव अन् वाझे केंद्राच्या ताब्यात, CBIचे पथक कारागृहात दाखल

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Money Landering Case), त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI)चे अधिकारी आर्थर रोड तुरुंगात पोहोचले आहेत. दरम्यान, याच प्रकरणातील मुंबईचे बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे दुसरे पथक तळोजा कारागृहात पोहोचले आहे. आजपासून हे चौघे जण केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असणार आहेत.

हेही वाचा: 'भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होईल', PM मोदींच्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त

पीएमएलए कोर्टाने आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना देशमुख, पालांडे आणि शिंदे यांचा ताबा केंद्रीय एजन्सीकडे सोपवण्याचे निर्देश दिले. तसेच एनआयए कोर्टाने नवी मुंबईतील तळोजा कारागृहाच्या अधीक्षकांनाही वाझेला सोपविण्याचे निर्देश दिले होते. चौघांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यासाठी कागदोपत्री काम सुरू असल्याच्या वृत्ताला दोन्ही कारागृहातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

अँटिलिया स्फोटकेप्रकरणातील कारचे मालक मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एनआयएने सचिन वाझेला १३ मार्च २०२१ ला अटक केली होती. तसेच ईडीने शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांना अटक केली होती. याप्रकरणी त्यांच्या दोन स्वीय्य सहाय्यांना देखील अटक केली होती. सीबीआयने चौघांनाही अटक करण्यासाठी वॉरंट मिळवले. त्याआधारावर एजन्सीने शुक्रवारी विशेष पीएमएलए न्यायालय आणि विशेष एनआयए न्यायालयात धाव घेतली आणि 21 एप्रिल 2021 रोजी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना अटक करण्याची परवानगी मागितली. त्यानुसार मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने शुक्रवारी देशमुख, पालांडे आणि शिंदे या तिघांना आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेण्याची परवानगी सीबीआयला दिली. तसेच शुक्रवारीच विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयाने सीबीआयला तळोजा कारागृहात असलेले मुंबईचे बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला ताब्यात घेण्याची परवानगी दिली.

Web Title: Cbi Team To Take Custody Of Anil Deshmukh His Secretary And Sachin Waze

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..