जनगणनेला जानेवारीत प्रारंभ

तात्या लांडगे
गुरुवार, 25 जुलै 2019

शासकीय योजनांपासून १३ कोटी जनता वंचित
केंद्र अथवा राज्य शासनाच्या विविध योजना मागील आठ वर्षांपासून २०११च्या जनगणनेचा आधार घेऊन राबविल्या जात आहेत. मात्र, आठ वर्षांत देशात अपेक्षित १० ते १५ टक्‍के वाढीप्रमाणे या योजनांपासून तब्बल ११ ते १३ कोटी जनता वंचितच राहत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आता २०२१च्या जनगणनेनंतर या वाढीव जनतेलाही शासकीय योजनांचा लाभ मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

सोलापूर - देशाच्या जनगणनेला जानेवारी २०२० पासून सुरवात होणार असून, त्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांसह राज्यातील सव्वातीन लाख प्राध्यापकांवर सोपवली जाणार आहे. जनगणना कार्यालयाने त्याचे नोटिफिकेशन सर्व जिल्ह्यांतील सांख्यिकी अधिकाऱ्यांना पाठविले असून, पुढील तीन महिन्यांत त्याच्या प्रशिक्षणाला सुरवात होणार असल्याची माहिती सांख्यिकी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत जनगणनेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

देशात ‘हम दो हमारे दो’चा नारा दिला जात असला, तरी मागील नऊ-दहा वर्षांत किती लोकसंख्या वाढली, याची माहिती आता जनगणनेच्या माध्यमातून समोर येणार आहे. तत्पूर्वी, या जनगणनेत सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणही (जातनिहाय) केले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०११च्या तुलनेत आता साधारणपणे १५ टक्‍के लोकसंख्या वाढली असेल, असा अंदाज आहे.

देशात आता २०२१च्या जनगणनेच्या तयारीला वेग आला आहे. जनगणना कार्यालयाकडून त्याची अधिसूचना प्राप्त झाली असून, ते काम यंदाही शिक्षकांवरच सोपविले जाणार आहे. त्यादृष्टीने लवकरच संबंधितांना प्रशिक्षण दिले जाणार असून, जानेवारी २०२० पासून जनगणनेला सुरवात होईल.
- अनिल गोडसे, मुख्य सांख्यिकी अधिकारी, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Census start in january