'केंद्राने शेतकऱ्यांना जास्त भरपाई द्यावी'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 मे 2018

मुंबई - बोंडअळीमुळे कापूस, तुडतुड्यांमुळे धान आणि ओखी वादळामुळे मच्छीमारांच्या बोटींचे झालेले आर्थिक नुकसान मोठे असून केंद्र सरकारने त्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पाहणी पथकाकडे केली. राज्य सह्याद्री अतिथिगृह येथे आज मुख्यमंत्र्यांच्या समवेत केंद्रीय पाहणी पथकाची आढावा बैठक झाली.

मुख्यमंत्री म्हणाले, 'कापसावरील बोंडअळीचा फटका राज्यातील 28 जिल्ह्यांना बसला असून, तुडतुड्यांमुळे सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने यापूर्वीच 3373.31 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे.'' केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा कृषी विभागाचे सहसचिव अश्विनीकुमार यांनी सांगितले, की केंद्रीय पाहणी पथकातील अधिकाऱ्यांनी गटागटाने विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला आहे.

Web Title: central government farmer compensation devendra fadnavis