भुजबळ राजकारणात सक्रिय होणार? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 मे 2018

भुजबळ तुरुंगात असताना गेल्या दोन वर्षांत राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात बरेच बदल झाले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ओबीसी राजकारणाची कास धरत गेल्या दोन दशकांत भुजबळांनी ओबीसींचे नेते म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली.

मुंबई - बेहिशेबी मालमत्ता तसेच मनी लॉंड्रिंगच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या राजकीय पुनरागमनाची उत्सुकता वाढली आहे. सत्तरी ओलांडलेले भुजबळ शारीरिक व्याधींवर मात करून राजकारणात जोमाने सक्रिय होणार, की प्रकृतिस्वास्थ्याअभावी राजकीय निवृत्ती पत्करणार, याविषयी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

भुजबळ तुरुंगात असताना गेल्या दोन वर्षांत राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात बरेच बदल झाले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ओबीसी राजकारणाची कास धरत गेल्या दोन दशकांत भुजबळांनी ओबीसींचे नेते म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली. गेल्या वर्षभरात मराठा क्रांती मोर्चाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढल्यानंतर ओबीसी समाजाला भुजबळांच्या नेतृत्वाची उणीव सातत्याने जाणवली. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने ओबीसी समूहाच्या आशा-आकांक्षा भुजबळांवर केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक असताना ओबीसी समाजाचे नेते भुजबळांच्या सुटकेसाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना भेटत होते. आता भुजबळांचे तुरुंगातून बाहेर येणे ही बाब ओबीसी नेत्यांना मोठी दिलासा देणारी ठरणार आहे. 

तुरुंगात असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने भुजबळांकडे दुर्लक्ष केल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. खासदार सुप्रिया सुळे तसेच अन्य नेते भुजबळांची अधूनमधून भेट घ्यायचे; मात्र या भेटी केवळ औपचारिकता पार पाडणाऱ्या होत्या, असे समर्थकांचे म्हणणे आहे. 

Web Title: Chagan Bhujbal will be active in politics