सर्व समाजघटकांची सोबत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २२ वर्षांची दमदार वाटचाल केली आहे आणि या वाटचालीत पहिल्या दिवसापासून मी पक्षाचे आणि देशाचे नेते शरद पवार यांच्यासोबत आहे.
Chagan Bhujbal
Chagan BhujbalSakal

- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २२ वर्षांची दमदार वाटचाल केली आहे आणि या वाटचालीत पहिल्या दिवसापासून मी पक्षाचे आणि देशाचे नेते शरद पवार यांच्यासोबत आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या वाटचालीचे मूल्यमापन कोणत्या निकषांवर करायचे, याबाबत काही शास्त्रीय परिमाणं उपलब्ध नाहीत. त्यामुळे राजकीय यश आणि सामाजिक काम या निकषांवरच हे मूल्यमापन करावं लागतं. या दोन्ही निकषांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीचं मूल्यमापन करताना दिसतं, ते आपल्यासमोर आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुतावर दृढ विश्वास

बावीस वर्षांपैकी साडेसोळा वर्षे पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आहे. दहा वर्षे पक्ष देशाच्या सत्तेत होता आणि महत्त्वाचे म्हणजे, शेतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्याच्या माध्यमातून शरद पवार देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत होते. इतरही काही राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ठळक अस्तित्व असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पावधीतच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. असे असले तरीसुद्धा महाराष्ट्र हीच राष्ट्रवादी काँग्रेसची कर्मभूमी आणि प्रभावक्षेत्र राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि विकास या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेवून पक्ष अखंडित व प्रवाहीपणे आपले काम करीत आला आहे. अन्याय, अत्याचाराविरुद्ध प्रभावीपणे संघर्ष करून मागासवर्गीय, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, महिला, अपंग, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळावा यासाठी धोरणे आखून त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीचे काम पक्षाने समर्थपणे पार पाडले आहे.

तळागाळातील घटकांच्या उत्थानासाठी कार्य

गेल्या काही वर्षांत जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न काही मंडळी सातत्याने करताना दिसताहेत; परंतु मला अभिमानाने नमूद करावेसे वाटते, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशा संकुचित राजकारणाला कधी थारा दिला नाही. मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे, या विषयावर शिवसेना सोडून मी पवार साहेबांसोबत काँग्रेसमध्ये आलो. त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या पवार साहेबांनी ओबीसींना आरक्षण दिले. त्या वेळी त्या आरक्षणाला अनेकांचा विरोध होता; परंतु समाजातील तळागाळातील घटकांच्या उत्थानासाठी निर्णय घेताना राजकीय फायद्या-तोट्याचा विचार करायचा नाही, ही भूमिका पवार साहेबांनी घेतली. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णयही त्यांनी याच भूमिकेतून घेतला. मी त्या वेळी मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत होतो. मला आठवतंय, की त्या वेळी या निर्णयांची राजकीय किंमत चुकवावी लागेल, अशी धोक्याची सूचना अनेक हितचिंतकांनी दिली होती.

पक्षातील, सरकारमधील काही लोकांनीही इशारा दिला होता; परंतु पवार साहेब बधले नाहीत. हे निर्णय आपण घेतले नाहीत, तर कुणीच घेणार नाही. आरक्षण दिलं पाहिजे, विद्यापीठाला नाव दिलं पाहिजे, महिला आरक्षण दिलं पाहिजे. सरकार राहील नाही तर जाईल, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली आणि सत्तेची किंमत देऊन महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले. आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय आहे. शेतीची वाताहत झाल्यामुळे मराठा समाजातील बहुसंख्य लोकांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्यासाठी आरक्षण मिळायला पाहिजे, अशी माझी आणि पक्षाचीही सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्यासाठी संसदेपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतची लढाई भविष्यातही निकराने लढण्याचा आमचा निर्धार आहे; परंतु काही लोक त्यावरूनही राजकारण करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करताहेत. वेगवेगळे समाजघटक आपसांत भांडत नाही तोवर मतांचा गठ्ठा मिळत नाही, अशी काही लोकांची धारणा आहे. त्यामुळे त्यांचे त्यांचे उद्योग सुरू असतात, त्याकडे दुर्लक्ष करून आमची विशिष्ट ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सर्व जाती, धर्मांच्या लोकांनी एकत्र येऊन वाटचाल करायला पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन, प्रत्येक घटकाला त्याचा त्याचा हक्काचा वाटा सन्मानाने मिळेल, अशी भूमिका घेऊन पक्षाची वाटचाल सुरू आहे.

समाजकारणास प्राधान्य

महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला अभिमान वाटावा, असे शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे अशी कार्यक्षम नेत्यांची फळी अन्य कोणत्याही पक्षाकडे दिसणार नाही. एकविसाव्या शतकात पदार्पण करताना राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या दोन दशकांमध्ये महाराष्ट्राला प्रगल्भ नेतृत्व दिले आणि भविष्यातही महाराष्ट्राला प्रगतिपथावर ठेवेल, अशा तरुण नेतृत्वाची जडणघडण पक्षाच्या माध्यमातून होत आहे. राजकारण सगळेच पक्ष करतात; परंतु आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांचा मात्र साठ टक्के समाजकारण आणि चाळीस टक्के राजकारणाचा आग्रह असतो. महाराष्ट्राला गेल्या वर्षभरात व्यापून राहिलेल्या कोरोनाच्या साथीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी त्याचे प्रत्यंतर घडवले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी उभारलेली कोविड केंद्रे असोत, रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून युवक शाखेने केलेले काम असो, किंवा हॉस्पिटल्सची बिले कमी करून देण्यासाठी सर्वसामान्य लोकांना केलेले सहकार्य असो... प्रत्येक आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अग्रभागी राहून काम केले आहे. अन्य राजकीय पक्षांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हाच मूलभूत फरक आहे.

आणखी एका मुद्द्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राजकीय पक्ष अनेक आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब आहे. जो चुकतो त्याला फटकारत दुरुस्त करण्याचे काम इथे केले जाते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, अडचणीतील कार्यकर्त्याच्या, नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची भूमिकाही पक्ष निभावत असतो. माझ्या आयुष्यातील अडचणीच्या काळात शरद पवार साहेब आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे माझ्यामागे उभे राहिले. त्यामुळेच प्रचंड मोठ्या संकटाशी झुंजण्यासाठी बळ मिळाले. मी झुंजलो आणि पुन्हा उभा राहिलो. अन्य कोणत्याही पक्षात हे घडू शकले नसते. पक्ष चुकत असेल तर पक्षात राहून इथल्या चुका सुधारण्याचे स्वातंत्र्यही आमच्या नेत्यांनी दिले आहे, त्यामुळे अन्य कोणत्याही पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत लोकशाहीचे वारे अधिक मोकळेपणाने वाहत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com