चैत्री वारीत अडीत लाख भाविक सहभागी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

चैत्र शुद्ध भागवत एकादशीच्या दिवशी राज्याच्या विविध भागांतून आलेले सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविक मोठ्या भक्तिभावाने चैत्र वारी सोहळ्यात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषामुळे पंढरी भक्तिमय झाली होती.

पंढरपूर - चैत्र शुद्ध भागवत एकादशीच्या दिवशी राज्याच्या विविध भागांतून आलेले सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविक मोठ्या भक्तिभावाने चैत्र वारी सोहळ्यात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषामुळे पंढरी भक्तिमय झाली होती. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज गोपाळपूर रस्त्यावर गेली होती. दर्शनासाठी आज सुमारे 10 तासांचा वेळ लागत होता.

चैत्री एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासूनच लाखो वारकऱ्यांनी वाळवंटात गर्दी केली होती. नदीच्या एकाच बाजूला होत असलेली गर्दी लक्षात घेऊन अनेक भाविक होडीतून पैलतीरावर जाऊन स्नान करत होते. तर काही भाविक नौकानयनाचा आनंद घेत होते. नदीच्या पैलतीरावरील 65 एकर जागेत, तसेच वाळवंट आणि शहरातील मठ व धर्मशाळांमधून सर्वत्र आज धार्मिक कार्यक्रमात वारकरी सहभागी झाले होते.

दरम्यान, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांना खिचडी व मठ्ठा यांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Chaitri Wari Bhavik Pandharpur