दसरा, दिवाळीनिमित्त खासगी बक्षीस योजनांचे पेव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

चाकण - उत्तर पुणे जिल्ह्यात दसरा, दिवाळी सणाच्या निमित्ताने खासगी बक्षीस योजनांचे पेव फुटले आहे. इव्हेंट कंपन्या बनवून तसेच ग्रुपद्वारे दुकानदार, व्यावसायिकांच्या फायद्यासाठी ग्राहकांना प्रलोभने दाखवत अनेकांनी खासगी बक्षीस योजना सुरू केल्या आहेत. या माध्यमातून नफेखोरीवर भर दिला आहे. या योजनांना सरकार, धर्मदाय आयुक्तांची परवानगी नाही. यातून ग्राहकांची फसवणूक होण्याचा धोका असल्याने या योजनांची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

चाकण - उत्तर पुणे जिल्ह्यात दसरा, दिवाळी सणाच्या निमित्ताने खासगी बक्षीस योजनांचे पेव फुटले आहे. इव्हेंट कंपन्या बनवून तसेच ग्रुपद्वारे दुकानदार, व्यावसायिकांच्या फायद्यासाठी ग्राहकांना प्रलोभने दाखवत अनेकांनी खासगी बक्षीस योजना सुरू केल्या आहेत. या माध्यमातून नफेखोरीवर भर दिला आहे. या योजनांना सरकार, धर्मदाय आयुक्तांची परवानगी नाही. यातून ग्राहकांची फसवणूक होण्याचा धोका असल्याने या योजनांची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

जाहिरात करतो, होर्डिंग्ज लावतो, पत्रके टाकतो, असे दुकानदारांना सांगत त्यांना बक्षिसांचे प्रलोभन दाखवत योजना सुरू केल्या आहेत. संबंधित दुकानात खरेदी केल्यास दहा ते वीस, पंचवीस टक्के सवलत, अशा जाहिराती करून ग्राहकांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यातून ग्राहकांना फायदा मिळण्याऐवजी फसवणूक होण्याचा धोका नागरिक व्यक्त करत आहेत.

सणासुदीला ग्राहक आपल्या दुकानाकडे वळावा, असे प्रत्येक दुकानदार, व्यावसायिकाला वाटत असते. त्यामुळेच कोणतीही अधिकृत परवानगी नसतानाही दुकानदार, व्यावसायिक काही हजार, लाख रुपये देऊन या योजनांत सहभागी होत आहेत. त्यांना कूपनची पुस्तके देण्यात येत आहेत. सहभागी दुकानदार, व्यावसायिकांकडून मिळालेल्या रकमेतून बक्षिसे देण्याचे प्रयोजन आहे. पण योजनांतून ग्राहकांना खरीच बक्षिसे मिळणार का, असा सवाल नागरिकांचा आहे. 

योजना चालविणारे बेकायदा होर्डिंग्ज लावून रस्त्यांचे विद्रुपीकरण करत आहेत. योजना सुरू झाल्याची जाहिरात ध्वनिवर्धकांवरून, एलईडी स्क्रीनद्वारे करत आहेत. जाहिरात करणारी वाहने भर चौकातच लावली जातात. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. अशा वाहनांना पोलिस ठाण्यांतून, प्रादेशिक परिवहन विभागाकडून परवानगी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. काही जण पोलिसांना चिरीमिरी देऊन ही जाहिरात करणारी वाहने बेकायदा शहरात फिरवितात, चौकात लावतात. उत्तर पुणे जिल्ह्यात दोन हजारांच्या वर बेकायदा होर्डिंग आहेत. अनेक ठिकाणी या होर्डिंगमुळे अपघाताचा धोका आहे. 

‘जीएसटी’च्या कचाट्यातून वाचण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ‘जीएसटी’ भरावा लागू नये यासाठी काही जण आटापिटा करत असल्याने यातून सरकारचे नुकसान होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. काही शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ असे नावे देऊन या योजनांच्या मार्केटिंगचे काम संबंधितांनी दिले आहे. या विद्यार्थ्यांचीही फसवणूक होण्याचा धोका असल्याने याला आळा घालावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

उत्तर पुणे जिल्ह्यात दसरा, दिवाळीच्या सणाला काही जण दुकानातील खरेदीवर बक्षीस योजना सुरू करत आहेत. अशा योजनांना धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. नागरिकांना आमिष दाखवून सुरू झालेल्या योजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, ग्राहक मंचाकडे तक्रारी कराव्यात. त्याची जरूर दखल घेतली जाईल तसेच ग्राहकांना अशी बक्षिसांची आमिषे दाखवून योजना सुरू करणाऱ्यांची चौकशी केली जाईल. ग्राहकांनी फसव्या बक्षीस योजनांपासून सावध राहावे. 
- रमेश काळे,  अतिरिक्त जिल्हाधिकारी 

Web Title: chakan news Dussehra Diwali celebration gift scheme