मराठा समाजाचा राज्यभरात 'चक्काजाम'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

भाजप-शिवसेना सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे भिजत घोंगडे पडले आहे. आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेऊ, असे आश्‍वासन सत्तेवर येण्याआधी भाजप-शिवसेनेने दिले होते. नंतर या सरकारने न्यायालयात विलंब होण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे लोक संतापले आहेत.
- खासदार अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी यांसारख्या मागण्यांसाठी मराठा समाजाने मंगळवारी मुंबईसह राज्यभरात शांततेने "रास्ता रोको' आंदोलन केले. मराठा क्रांती मोर्चाने आखून दिलेल्या आचारसंहितेचे तंतोतत पालन करत विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. मुंबईसह पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नवी मुंबई, वाशी, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसरांतील रस्त्यांवर सकाळी आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक काही वेळ विस्कळित झाली होती. दोन तासांनी आंदोलन मागे घेतल्याने हळूहळू वाहतूक सुरळीत झाली. या आंदोलनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. यात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने सहभागी होत मुंबईत 6 मार्चला निघणाऱ्या मोर्चाची चुणूक दाखवून दिली. मुंबईत लालबाग, परळ, दादर टीटी, प्लाझा, हिंदमाता, वरळी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चेंबूर, दहिसर टोल नाका, मुलुंड चेक नाका, मुलुंड एलबीएस मार्ग, मुलुंड पूर्व द्रुतगती मार्ग, वाशी, ऐरोली, कामोठे, डोंबिवली आदी ठिकाणी सकाळी 11च्या सुमाराला रास्ता रोको आंदोलन झाले. दोन तास आंदोलन सुरू होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. स्वयंसेवकांची एक फळी संयम राखून आंदोलन करण्यावर लक्ष देत होती. पोलिसांनाही सहकार्य करत रुग्णवाहिका आल्यास मार्ग मोकळा करून देत होती.

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी न्यायालयात 27 फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू होणार आहे. सरकारने भक्‍कम पुरावे सादर करण्याची तयारी केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने आरक्षण देण्यात केलेल्या चुका दुरुस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असून, न्यायालयात बाजू मांडण्याची सर्व तयारी सरकारने केली आहे.
- विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री

Web Title: chakka jam agitation by maratha kranti morcha