राज्यात उद्यापासून पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे - राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका वाढला असला तरीही येत्या रविवारपासून (ता. 15) मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला. येत्या मंगळवारपर्यंत (ता. 17) पूर्वमोसमी पावसाचे ढग राज्याच्या काही भागांत गडगडतील, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

बंगालचा उपसागर आणि श्रीलंका, कोमोरिन परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्यातच तमिळनाडूचा दक्षिण भाग ते कर्नाटकच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या भागात सरकण्याची शक्‍यता आहे. मध्य प्रदेश, गुजरातच्या उत्तरेकडील भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्‍यता निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. 

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या शनिवारी (ता. 14) हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी शनिवारनंतर पुढील दोन दिवसांमध्ये जोरदार वारा सुटून मेघगर्जनेसह गारांचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात कोरडे हवामान राहील, असे हवामान खात्याने सांगितले आहे. 

राज्यातील बहुतांश भागांत सकाळी दहा वाजल्यापासून उकाडा जाणवायला सुरवात होत आहे. दुपारी उन्हाच्या कडाक्‍यामुळे तापमानाचा पारा चाळिशी ओलांडत आहे. दुसरीकडे अचानक काही भागांत ढगाळ हवामान होत आहे. 

नगरला सर्वाधिक तापमान 
राज्यात सर्वाधिक तापमान नगर येथे 40.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा हा पारा 1.3 अंश सेल्सिअसने वाढला होता. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 37.7 अंश सेल्सिअस नोंदला गेला. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात उन्हाचा चटका वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Chance of rain from tomorrow in the state