राज्यात पावसाची उघडीप; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

पुणे शहर आणि परिसरात येत्या चोवीस तासांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता 25 ते 50 टक्के आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

पुणे -  मॉन्सूनची उत्तरेकडील राज्यांमध्ये वाटचाल सुरू असली तरीही महाराष्ट्रात मात्र त्याने उघडीप दिली आहे. येत्या बुधवारी (ता. 24) कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भातील काही भागात तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ राज्यात मॉन्सून दाखल झाला. त्याने 14 जूनला संपूर्ण राज्य व्यापले. त्यानंतर त्याची उत्तरेकडील वाटचाल सुरू झाली. कोकणासह मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली. त्यानंतर मात्र त्याने दडी मारली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

राज्यात मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. येत्या बुधवारी (ता. 24) कोकण विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

उत्तर भारतात पूर्व पश्‍चिम विस्तारलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकून, राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होता. तर ओरिसा आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती नैर्ऋत्येकडे झुकलेली असल्याने उत्तर आणि मध्य भारतात पावसाला पोषक हवामान झाले. तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. कोकणातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला असला तरी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी मुख्यत: कोरडे हवामान होते. राज्याच्या अनेक भागांत अंशत: ढगाळ हवामान असून, ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. कमाल तापमानासह उकाड्यातही वाढ झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्यात ढगांच्या गडगटासह पावसाची शक्‍यता 
शहर आणि परिसरात येत्या चोवीस तासांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता 25 ते 50 टक्के आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. कमाल तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जाईल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of rainfall in Central Maharashtra, Marathwada