मराठा मोर्चाला विरोधकांची फूस: चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 मे 2018

मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांना निधी कोणी पुरवला, पत्रकार परिषद घेण्यासाठी मदत कोणी केली, जागा कोणी दिली, याची सर्व माहिती पोलिस यंत्रणेकडे आहे. योग्य वेळी त्याचा भंडाफोड करू. सरकारच्या गुप्तचर विभागाने याबाबतची सविस्तर माहिती पुराव्यासह जमा केली आहे. 
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री 

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सक्षम असताना काही मराठा नेत्यांना हाताशी धरून सरकारविरोधात आक्रमक होण्याची फूस विरोधकांकडून लावली जात असल्याचा आरोप करत या फूस लावणाऱ्या नेत्यांचा भंडाफोड करू, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारने काढलेल्या आदेशाच्या प्रति फाडल्या होत्या. तर गुरुवारी (ता. 3) काही समन्वयकांनी चंद्रकांत पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन समाजाच्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला होता. 

आज पाटील यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेत, 99 टक्‍के मराठा समाज सरकारच्या निर्णयावर समाधानी असल्याचा दावा केला. मात्र काही नेत्यांना विरोधक फूस लावत आहेत. त्यांना सरकारच्या विरोधात भडकावत आहेत. या सर्वांची गोपनीय माहिती सरकारकडे आहे. 

मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांना निधी कोणी पुरवला, पत्रकार परिषद घेण्यासाठी मदत कोणी केली, जागा कोणी दिली, याची सर्व माहिती पोलिस यंत्रणेकडे आहे. योग्य वेळी त्याचा भंडाफोड करू. सरकारच्या गुप्तचर विभागाने याबाबतची सविस्तर माहिती पुराव्यासह जमा केली आहे. 
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री 

Web Title: Chandrakant Patil talked about Maratha Kranti Morcha