मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil
Chandrakant Patil

फुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल कोर्टात टिकविण्यासाठी कोर्टात वकिलांची फौज उभी करू असे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

फुलंब्री विधानसभा मतदार संघातील सावंगी गावात विविध रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा शनिवारी (ता.17) रोजी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, आमदार अतुल सावे, वैज्ञानिक महामंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी मंत्री नामदेवराव गाडेकर, भाजपच्या प्रभारी महिला जिल्हाध्यक्ष अनुराधाताई चव्हाण, उपमहापौर विजय औताडे, माजी महापौर बापू घडामोडे, भावराव देशमुख, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर, बाजार समितीचे संचालक विलास उबाळे, भाजयु मोर्चाचे तालुकाध्यक्ष विकास गायकवाड, शहराध्यक्ष योगेश मिसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी वेगवेगळ्या रस्त्याच्या कामाची माहिती दिली. पुढे बोलतांना मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले कि, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवून त्या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवालावर चर्चा करून आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या मागासवर्ग आयोगाने सकारात्मक अहवाल दिलेला आहे. त्यावर अभ्यास करणे सुरु आहे. हा अहवाल कोर्टात टिकविण्यासाठी राज्य सरकार वकिलांची मोठी फौज उभी करणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे, राज्यात मी मंत्री होण्याअगोदर केवळ सतराशे कोटी रुपये होते. मात्र केंद्र सरकारकडून एक लाख सहा हजार कोटीचा निधी महाराष्ट्र राज्यासाठी आणून दर्जेदार रस्त्याचे काम केले जात आहे. त्यामुळे विरोधकांनी किमान केलेल्या कामाचे तरी कौतुक करायला पाहिजे अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसला केली आहे.समृद्धी महामार्गातही शेतकऱ्यांना चार पट पैसे देऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे काम करण्यात आले आहे. दळणवळण, गाव आणि शहराच्या विकासासाठी एक्स्प्रेस हायवे असणे गरजेचे आहे.त्यासाठी सरकार प्रयत्नशील असून हजारो कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्गाचे काम केले जात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

एका विद्युतपंपाला एक ट्रान्स्फार्मा देणार : दानवे
शेतकऱ्यांना रस्ते, पाणी आणि वीज देण्याचे काम भाजप सरकारने घेतलेले आहे. आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वीज असणे गरजेचे आहे. हि शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन भाजप सरकार आगामी काळात एका विद्युत पंपाला एक ट्रान्स्फार्मा देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येईल आणि शेतकऱ्यांचे दरडोई उत्पादनात मोठ्या प्रमाण वाढ होईल. शेतकऱ्याला समृद्ध बनविण्याचे काम भाजप सरकारने सुरु केले असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

व्हय... बाजूला मी चाललो रजिस्ट्रीला : हरिभाऊ बागडे
समृद्धी महामार्गातही विरोधकांनी शेतकऱ्यांना जमिनी देऊ नका म्हणून साकडे घालून विकास कामात बाधा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांना चार पट जमिनीचा मोबदला सरकारने दिल्यामुळे अनेक शेतकरी समृद्धी महामार्गासाठी जमिनी द्यायला तयार आहेत. त्यामुळे जमिनी नका देऊन म्हणून विकासकामात आढकाठी आणणाऱ्याला  व्हय बाजूला मी चाललो रजिस्ट्रीला म्हणून बाजूला केले असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.मी विधानसभा अध्यक्ष असल्याने एकाचा खात्याचा निधी न वापरता फुलंब्री मतदार संघाच्या विकासासाठी सगळ्या मंत्र्याकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून फुलंब्री मतदार संघाचा विकास साधण्याचे काम केले आहे. मतदार संघातील रस्त्याचा दर्जा वाढवून जिल्हा प्रमुख महामार्ग बनविले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मोठ्या प्रमाणत रस्त्याचे काम केले असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com