बारामतीच्या रिंगणातून चंद्रराव तावरे यांची माघार

मिलिंद संगई
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

माळेगावचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण निवडणूकीच्या रिंगणात उतरणार नाही, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार निश्चित करु असे सांगितले. त्यामुळे ही लढत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे होणार नाही हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

बारामती : माळेगावचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण निवडणूकीच्या रिंगणात उतरणार नाही, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार निश्चित करु असे सांगितले. त्यामुळे ही लढत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे होणार नाही हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

माळेगावचे विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांनीही ही जागा वाटपात शिवसेनेकडे आहे, जर चर्चेदरम्यान ही जागा भाजपला मिळाली आणि पक्षाने आदेश दिला तर आम्ही निवडणूक लढवू अशी भूमिका घेतली आहे. पक्षसूचनेनुसार आज सासवडला या प्रक्रीयेत आम्ही सहभागी झालो असल्याचेही रंजन तावरे यांनी स्पष्ट केले. 

एकीकडे चंद्रराव तावरे यांनी निवडणूकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे रंजन तावरे यांनीही सावध भूमिका घेतली आहे तर भाजपच्या वाटयाला ही जागा आली तर ज्यांना प्रबळ दावेदार समजले जात होते ते बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, प्रशांत नाना सातव हे या प्रक्रीयेपासून आज दूर असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बारामती मतदारसंघावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच लक्ष केंद्रीत केलेले असल्याने बारामतीबाबत शेवटच्या क्षणी काही वेगळी रणनीती समोर येते की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 

दरम्यान, आज सासवड येथे झालेल्या मुलाखती दरम्यान रंजन तावरे, कुलभूषण कोकरे, गोविंद देवकाते, अभिजित देवकाते, सुरेंद्र जेवरे, राहुल तावरे यांनीही उमेदवारी मागितली आहे अशी माहिती अँड. नितीन भामे यांनी दिली. पक्षाचे निरिक्षक रवींद्र चव्हाण यांनी इच्छुकांशी चर्चा केली. राष्ट्रीय समाज पक्षाकडूनही बारामतीत उमेदवार दिला जाणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही लढत सरळ होणार की तिरंगी होईल याबाबतही आता चर्चा सुरु झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrarao Tawre will not Contest assambly Election