भाजप-शिंदे युतीत फूट? भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याने अंतर्गत वाद पेटला! - BJP vs Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis and Eknath Shinde

BJP vs Shinde : भाजप-शिंदे युतीत फूट? भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याने अंतर्गत वाद पेटला!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या चर्चेत आहेत. पुढील वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी भाजपनेही मोठी रणनीती आखून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत वाद पेटला आहे. 

आमदार संजय शिरसाट म्हणाले, बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये काही दम नाही. त्यांना तेवढे अधिकार नाहीत. त्यांना असे बोलण्याचे अधिकार कुणी दिले?. असे वक्तव्य केल्यामुळे युतीमध्ये बेबनाव येतो. याची जाणीव बावनकुळेंनी ठेवली पाहिजे. आम्ही ४८ जागा लढवायला काय मुर्ख आहोत का?, याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. अशा वक्तव्यामुळे कार्यकर्ते देखील नाराज होतात. 

बावनकुळे यांनी अतिउत्साहात वक्तव्य केले आहे. त्यांना वाटत की मी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे माझ्या नेतृत्वाखाली जास्त जागा याव्या. मात्र अशा वक्तव्यामुळे सहकारी पक्ष त्यांना यात्रा त्रास होतो. आपल्या अधिकारात जेवढं आहे तेवढचं बावनकुळे यांनी बोललं पाहिजे, असे संजय शिरसाट यांनी बावनकुळे यांना सुनावले. 

चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप २४० विधानसभा जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले होते.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केवळ ५० आमदार आहेत. त्यांना यापेक्षा जास्त जागांची गरज नाही, असे बावनकुळे म्हणाले होते. बावनकुळे यांच्या या विधानामुळे शिवसेना-भाजप युतीत तेढ निर्माण होऊ शकते, असे मानले जात आहे.