
Maharashtra Politics : शरद पवारांचा राजीनामा अन् भाजपनं दिली ऑफर! चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या निर्णयाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी घेतलेल्या या निर्णयाचे थेट पडसाद राज्याच्या राजकारणात देखील उमटताना दिसत आहेत. दरम्यान शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी पक्षात देखील अस्थिरतेचं वातावरण आहे. यादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.
ज्या नेत्याने ५० वर्ष पक्षाचं नेतृत्व केलं आहे, त्यांनी निर्णय घेतला की दुसऱ्याला अध्यक्ष करायचं तेव्हा आपले भावनात्मक संबंध असतात त्यामुळे लोकांना वाईट वाटतं. त्यामुळे पक्षात राजीनामा नाट्य असेल. पण राष्ट्रवादीतील कुणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. आमच्याकडे कुणीही आलं नाही. कुणाच्याही पक्षप्रवेशाची काहीही चर्चा झाली नाही आणि आमच्यातील कुणीही राष्ट्रवादीतील नेत्यांशी संपर्क केला नाही.
बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवारांनी जे काही काम केलं आहे, त्यांच्या कामाचे भावनात्मक संबंध लोकांशी आहेत. त्यामुळे शरद पवारांनीच अध्यक्ष राहिलं पाहिजे, त्यांनीच पक्ष चालवला पाहिजे, असं त्यांना वाटतं. त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडली आहे. शेवटी आमच्याकडे कुणीही पक्षप्रवेशासाठी आलं तर आमचे दरवाजे उघडेच आहेत.
आम्ही कुणालाही नाही म्हणत नाही. आम्ही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहोत. आमच्या पक्षात कुणीही यायला तयार असेल तर आम्ही कधीही कुणाचा पक्षप्रवेश थांबवत नाही, जो जो पक्षात येईल त्याला आम्ही पक्षात घेतो असंही बावनकुळे पुढे म्हणाले.
महाविकास आघाडीमधील सध्याच्या अस्थिरतेवर देखील बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय करणे त्यांचं काम आहे. त्यांच्या पक्षात कोणाला अध्यक्ष कारायचं हे त्यांचं काम आहे असे बावनकुळे म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचा कुठलाही नेता आमच्या संपर्कात नाहीये. पण भाजपमध्ये कुणाला यायचे असेल तर भाजपचे दरवाजे उघडे आहेत हे देखील बावनकुळे यावेळी म्हणाले.
वज्रमुठीला तडे गेले आहेत, महाविकास आघाडी ही ज्या नेतृत्वाच्या हातात आहे त्यावर प्रश्नचिन्ह आहे. वज्रमुठच्या सभेचा शेवट उद्धव ठाकरे करतात. त्यांच्याच पक्षाच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही त्यामुळे ते महाविकास आघाडीचं नेतृत्व करतील. यामुळे मोठ्या प्रमाणावर वज्रमुठ ढिली पडत चालली आहे, असेही बावनकुळे म्हणाले.