ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत न्या. धर्माधिकारी यांचे निधन

Chandrashekhar-Dharmadhikari
Chandrashekhar-Dharmadhikari

नागपूर - ज्येष्ठ गांधीवादी, लेखक, विचारवंत, माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी (वय ९१) यांचे गुरुवारी पहाटे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे न्या. सत्यरंजन व ॲड. आशुतोष, मुलगी डॉ. अरुणा पाटील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या निधनाने साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व विधी क्षेत्रांवर शोककळा पसरली असून, सर्वसामान्यांच्या कल्याणाची आस बाळगणारा एक सच्चा व समन्वयी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. 

ज्येष्ठ गांधीवादी दादा धर्माधिकारी यांचे पुत्र असलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावर लहानपणापासून गांधी तत्त्वज्ञानाचा प्रभाव राहिला. त्यांचा जन्म रायपूर (तेव्हाचा मध्य प्रदेश) येथे २० नोव्हेंबर १९२७ रोजी झाला.

त्यांचे प्राथमिक शिक्षण रायपूर येथे झाल्यानंतर वर्धा येथील नवभारत विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. महात्मा गांधी यांच्या विचारांचे पाईक असलेले दादा धर्माधिकारी यांनी वर्धा येथील शाळेत त्यांना शिक्षण दिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात एसबी सीटी महाविद्यालय व शासकीय विधी महाविद्यालयात झाले. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. १९५८ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवून नागपुरात वकिली सुरू केली. 

राज्य सरकारने १९६५ मध्ये त्यांची सहायक सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. १९७२ मध्ये ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. १९८९मध्ये निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रशासन लवादाच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती.  या काळात त्यांनी महिलांचे अधिकार, आदिवासींचे हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर आधारित अनेक वैशिष्ट्यपूर्ण निकाल दिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अधिकार कुणी हिरावू शकत नाही, असा निकाल देत सरकारी दबावाला भीक घातली नाही. 

‘पद्मभूषण’ने सन्मान
निवृत्तीनंतर न्या. धर्माधिकारी यांचा विविध सामाजिक संस्थांशी असलेला संबंध अधिक दृढ झाला. बहुतेक गांधीवादी संस्थांमध्ये त्यांचा शब्द अखेरचा मानला जायचा. जमनालाल बजाज फाउंडेशनचे ते विश्‍वस्त होते. नागपुरातील सर्वोदय आश्रमाचे अध्यक्ष होते. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने २००३ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित केले होते.

धर्माधिकारी श्रद्धांजली
न्या. धर्माधिकारी यांनी त्यांचे पिता आणि ज्येष्ठ विचारवंत दादा धर्माधिकारी यांचा वैचारिक आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा समर्थपणे सांभाळला होता. अत्यंत कमी वयात स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यासोबतच न्यायदानाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. महिला सुरक्षा प्रश्नांवर त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अनेक उपयुक्त सूचना केल्या आणि त्या सरकारने स्वीकारल्या होत्या.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com