स्वत:त बदल करावे लागतील!

शेखर नानजकर 
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

(भाग – 3)

(भाग – 3)

माणसाला सतत काहीतरी नवीन हवं असतं. हा त्याचा नाविन्याचा शोध फार पुरातन आहे. याच नादापायी त्याने अनेक गोष्टी शोधल्या, वापरल्या आणि सोडून दिल्या. निसर्ग माणसाला कधीच नवीन नव्हता. तो निसर्गत:चं जन्माला आला, त्याच्या साथीनंच वाढला आणि हळूहळू एक दिवस निसर्गापासून वेगळा झाला. इतका वेगळा झाला, की आपण निसर्गत:च जन्माला आलेले आहोत हेच तो विसरला! आणि खरंच तसं झालं. निसर्गाशी असलेलं त्याचं नातं त्याच्या विस्मृतीत गेलं. तो इतका वेगळा झाला की आता पुन्हा निसर्गात: जागणं त्याला दुरापास्त आहे. एखादं फळ झाडापासून तुटून किंवा पिकून पडलं की जसं पुन्हा कितीही प्रयत्न केले तरीही झाडाला पुन्हा जोडता येत नाही, अगदी तसंच! 

त्याच्या सुरुवातीच्या काळात निसर्ग रोजचाच जीवनाचा भाग होता. मधल्या युद्ध, संशोधन, प्रगती वगैरेच्या कळत तो  विस्मृतीत गेला. मग युद्ध कमी झाली. थोडं स्थैर्य आलं. आणि माणसाला पुन्हा निसर्गाची आठवण झाली. पण आता निसर्गात आणि त्याच्यात एक कायम स्वरूपी दुरावा निर्माण झाला होता. आता त्याला ती आठवण आपला निर्माता, पालनकर्ता, आप्त म्हणून नाही झाली. आता तो निसर्गाकडे एका त्रयस्थ नजरेनं पाहू लागला. निसर्ग त्याला आता एक उपभोगाची गोष्ट म्हणून आठवू लागली. आपण या निसर्गाचा एक भाग आहोत या जुन्या कल्पना बदलून, हा निसर्ग आणि त्यात असलेलं सगळं हे मला उपभोगायलाच निर्माण केलं आहे अशी त्याची भावना झाली. काहींना तर असं वाटू लागलं की हा आपण जेवढा ओरबाडू, जेवढा वापरू तितके आपण ‘स्मार्ट’! यातला अजून एक वर्ग असा होता, की ज्याला आलेल्या आर्थिक आणि सामाजिक स्थैर्यामुळे, निसर्ग पहावासा वाटू लागला होता. त्याचा आनंद घ्यावासा वाटू लागला होता. पण दुरूनच! एका त्रयस्थ भावनेनं. उपभोगाच, पण नजरेनं घेतलेला, कमी हानिकारक! आपण सगळे यातच मोडतो! 

२००० साल नंतर निसर्गदर्शनाचं जे पेव फुटलं, त्यात वर्षाकाठी लाखो लोक निरनिराळ्या अभयारण्यात जाऊ लागले. काहीतरी वेगळं करायाल मिळणार या आनंदात हजारो रुपये खर्च करू लागले. फोटोग्राफीवर लाखो रुपये उधळू लागले. पण भावना मी मगाशी म्हणालो तीच आहे, त्रयस्थपणा आणि उपभोग. बहुतेकजण निसर्गात जाताना स्वत्वाची भावना विसरत नाहीत. हे सगळं पाहण्यासाठी मी किती पैसे खर्च केलेले आहेत हा आकडा डोक्यातून, मनातून जात नाही. अभारण्यात गेल्यावरही कपडेलत्ते, राहणीमान, जेवणखाण, निवास सगळं सगळं शहरीच राहतं! मानानं, मन:स्थितीनं शहरी असलेले आपण, फक्त डोळ्यानं समोरचा निसर्ग, प्राणी वगैरे पाहतो. आपल्याच घराच्या दिवाणखान्यात बसून टीव्ही पाहिल्यासारखं! 

खरा निसर्ग जर पाहायचा असेल, हे निसर्गचक्र कसं चालतं हे अनुभवायचं असेल, प्राणी जगतात कसे, याचं ज्ञान व्हयचं असेल, किती खडतर असतं हे जीवन याची जाण यायची असेल तर मनुष्यरहित निसर्गात, पूर्ण निसर्गात: (म्हणजे विवस्त्र नव्हे!), निसर्गाचे नियम पाळूनच राहावं लागेल. जंगलाच्या सीमारेषेवरच आपल्या मनावरची शहरीपाणाची वस्त्र उतरवून ठेवावी लागतील. स्वत:चा माणूस म्हणून विचार न करता, त्या जंगलातला एक जीव म्हणूनच विचार करावा लागेल. यासाठी जंगलाचे सर्वसाधारण नियम सामजावून घ्यावे लागतील. ती जीवनशैली अंगात मुरावावी लागेल. काय असते ही जीवनशैली? काय असतात हे नियम? प्राण्यांच्या जीवनाकडे पाहिलं की लगेच समजेल! 

१) दिखावा नको – जंगलातला कुठलाच प्राणी कधी अनावश्यक दिखाऊपण करत नाही. मग तो शिकारी असलेला वाघ असो, किंवा सावज असलेलं सांबर असो. प्रत्येकजण लपून लपूनच जगतो. अनावश्यक दिखाऊपणानं आपण स्वत:वर संकट ओढवून घेऊ याची जाणीव प्रत्येकाला असते. दिखाऊपणामुळे जंगलात कुठलाच फायदा होत नाही. उलट तोटा होण्याची शक्यताच जास्त!

२) आवाज नको – पक्षी सोडले तर जंगलात कुठलाही जीव सतत आवाज करणं टाळतो. प्राण्यांमध्ये तर आवाजाचा उपयोग शक्यतो फक्त जोडीदाराला बोलाविण्यासाठीच केला जातो. प्राण्यांना हे माहित असतं, की आवाज करून शिकारी सावजाला, किंवा सावज शिकाऱ्याला आपल्या अस्तित्वाची अनावश्यक जाणीव करून देत असतं. आपण आवाज केला, तर आपल्याला इतरांचे आवाज येणार नाहीत, पण इतरांना आपला आवाज जाईल. म्हणू शक्यतो आवाज न करणं.

३) अखंड सावधानता! – प्रत्येक प्राण्याला हे नक्की माहित असतं, की कुठल्याही वळणावर, आडोशाला धोका लपलेला असू शकतो! ही नुसती कल्पना नसते, विदारक सत्य असतं. कुठल्याही क्षणी मृत्यूशी सामना होऊ शकतो. आत्ममग्न राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रणच! हालचालीत अखंड सावधानता हवी.

४) गात्रं सतर्क हवीत – प्राण्यांच्या जीवनाचा सगळा खेळ हा मुख्यत: तीन गत्रांवर आधारित असतो. डोळे, कान आणि नाक! ही तीनही गात्र जी अखंड आणि एकाच वेळेस कार्यरत असावी लागतात. तर आणि तरच स्वसंरक्षण आणि अन्नाचा शोध या दोन्ही जीवनावश्यक गोष्टी साधता येऊ शकतात. 

५) सदैव सशक्तता – कृशपणाला निसर्गात स्थान नाही. जोपर्यंत तुम्ही सशक्त आहात, तोपर्यंतच तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे, असं निसर्ग सांगतो.

६) सदैव वर्तमानात – मागचं, झालेलं आणि फार पुढचं, याचा फार विचार नको. आजचं आणि अत्ताचं याचाच विचार महत्वाचा! धोका कोठूनही आणि कधीही येऊ शकतो. भूत किंवा भविष्यात गुंतून राहिलं तर काळ कधीही झडप घालू शकतो. म्हणून सदैव वर्तमानात!

या व आशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रणीजीवनाकडून शिकता येतात. अनंत पिढ्या ते जंगलातच जन्माला आले, वाढले आहेत. जंगल शिकायचं तर त्यांच्याकडूनच शिकावं लागेल. इथे मी माणूस आहे, अमका तमका शिकलो आहे, इतका श्रीमंत आहे, यावर हे ज्ञान अवलंबून नसेल. इथे ते गुरु आहेत. 

जंगलात जात असताना काही गोष्टी सतत लक्षात ठेवल्या पाहिजेत... आपण जंगलात उपरे आहोत. आपलं तिथे काहीच स्थान नाही. आपली तिथे काहीच गरज नाही. आपण प्राण्यांना पहिल्यानं त्यांना कधीही आनंद होणार नाही. उलट आपण तिथे असल्याचा त्यांना त्रासच आहे. आपण त्यांना तिथे नको आहोत. फक्त ते आपल्याला विरोध करू शकत नाहीयेत, इतकंच! आपण त्यांच्यात कधीच सामावून जाऊ शकणार नाही आहोत. आपण म्हणजे त्या स्वच्छ निसर्गातलं एक प्रदूषण आहोत. आपल्या बरोबर जंगलात येण्याऱ्या गोष्टी म्हणजे त्या निसर्गावर त्याच्या मनाविरुद्ध लादलेला एक बोजाच आहे. आपल्या येण्याच्या आधी हा निसर्ग अधिकच सुंदर होता. आपल्या येण्यानं तो घाण व्हायला सुरुवात होणार आहे. थोडक्यात आपण निसर्गात कुठलीही भर घालायला चाललेले नाही आहोत. निसर्ग आणि तिथले जीव मनुष्यप्राण्याचे कधीच मनापासून स्वागत करणार नाहीत! हे लक्ष्यात ठेउनच जंगलात पाय ठेवायला हवा!

थोडक्यात, जंगलं पाहण्याचे काही नियम आहेत. खूप संख्येनं जंगलात जाता येणार नाही. आवाज वाढतो. हालचाल वाढते. खरंतर चारपाच पेक्षा जास्त संख्या नकोच. फार हालचाल नको. जंगलात शिरल्यापासून बाहेर येईपर्यंत तोंडातून चाकर शब्द बाहेर यायला नको. जे काही सांगायचे असेल ते खुणांनी सांगा. कसलाच आवाज नको. जंगलात जाळ नको. प्राण्यांना आगीची भीती वाटते. आगीमुळे त्या परिसरात धूर होतो. प्राण्यांना त्याची सवय नसते. चारपाच दिवस गार अन्न खाल्ल तर आपलं काही बिघडत नाही. पॅक फूड खाऊ शकतो. पाण्याचा अत्यंत आवश्यक तेवढाच वापर. अंघोळी, वारंवार तोंड धुणे वगैरे लाड जंगलात चालत नाहीत. पाणवठ्यांपाशी जाणं शक्यतो टाळावं लागेल. इथेच काय ते प्राण्यांना पाणी मिळतं. त्यांची गरज आणि अधिकार पहिला आहे. आपण तिथे उपरे आहोत. पाणी कशाततरी घेऊन पाण्यापासून दूर व्हा. संध्याकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत चुकुनही पाणवठ्यांपाशी जाऊ नका. 

संध्याकाळी चार ते रात्री आठ ही प्राण्यांची बाहेर पडण्याची वेळ असते. या काळात एकाच ठिकाणी बसायला हवे. हे ठिकाणही आधीच शोधून ठेवायला हवं. दुपारी चार वाजण्याच्या आधी तिथे जावून बसायला हवं. आता चार तास एकाच ठिकाणी बसायचं. इंग्रजीत म्हणतात टू इज कंपनी, थ्री इज क्राउड. पण जंगलात टू इज अल्सो अ क्राउड! एकट्यानंच बसायला हवं. एकट्यानं जे जंगलं समाजतं, ते सोबतीनं कधीच समाजत नाही. कान, नाक आणि डोळे ही इंद्रियं सतत जागरूक हवीत. 

ही झाली प्राथमिक तयारी. सांगण्यासारखं खूप आहे. अनुभवानं खूप काही शिकलोय. स्वत:त खूप बदल करावे लागतात. हे मनात पक्कं बसेल, तेंव्हा त्यातला काही भाग आचरणात उतरेल. मग हळूहळू निसर्ग अंगात भिनू लागेल. त्याची स्पंदानं जाणवू लागतील. जंगलाविषयी अजुन खूप लिहायचंय. ही सुरुवात आहे. पुढच्या लेखात...!

Web Title: change in ourselves is necessary