महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी विचारमंथन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरम
दिनांक २४ व २५ जानेवारी २०१७, नेहरू सेंटर, मुंबई अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

पुणे - विविध क्षेत्रांत समाजाचे नेतृत्व करणाऱ्या समाजधुरिणांना सुजाण समाजनिर्मितीसाठी मदत करणारे व्यासपीठ म्हणून काम करणाऱ्या "डिलिव्हरिंग चेंज फोरम'च्या वतीने 24 आणि 25 जानेवारी रोजी मुंबईत दोन दिवसांचे विचारमंथन होणार आहे. "सकाळ माध्यम समूह', "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'ने महाराष्ट्र सरकार आणि जगभरातील अन्य काही मान्यवर संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत सहभागी होणारे विविध देशांतील सर्व तज्ज्ञ तसेच राज्यभरात विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे निमंत्रित मान्यवर पुढील काळात महाराष्ट्रात परिवर्तन घडविण्यासाठी काम करणार आहेत. 

उद्‌घाटनाच्या सत्रानंतर "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांच्या बीजभाषणाने परिषदेला सुरवात होईल. नेहरू सेंटरच्या अद्ययावत संकुलात ही परिषद होत आहे. भविष्यातल्या सुजाण समाजाबरोबरच अधिक उत्तम प्रशासकीय आणि औद्योगिक प्रणाली बांधण्याच्या दिशेने प्रयत्न करताना जगभरात अशा प्रणाली निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे दिग्गज त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना या परिषदेत मांडणार आहेत. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणताना, या तज्ज्ञांनी उपलब्ध साधनसामग्रीचा अधिक परिणामकारक वापर करण्यावर भर दिला आहे. 

स्टार्ट-अप, विविध क्षेत्रांतील अन्य उद्योग, उद्योजगता प्रशिक्षण, स्मार्ट शहरे आणि गावे, त्यासाठी आवश्‍यक असणारी भांडवल उभारणी, बदलत्या जगातल्या संधी शोधताना आवश्‍यक ठरणारी कौशल्ये, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध मुद्द्यांवर महाराष्ट्रात प्रत्यक्ष काम करण्याची तयारी या तज्ज्ञांनी दर्शवली आहे. "सकाळ'च्या "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या माध्यमातून हे सर्व तज्ज्ञ महाराष्ट्राशी जोडले जाणार आहेत. 

बदलांच्या दिशेने जाणाऱ्या समाजाच्या गरजा आणि आव्हाने समजून घेऊन त्यावर संवाद घडवून मार्ग शोधणारे व्यासपीठ निर्माण करणे, असेही या परिषदेचे एक उद्दिष्ट आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध आर्थिक-सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सक्रिय व्यक्तींचे गट करून त्यांच्या सहभागाने अगदी शेवटच्या स्तरापर्यंत बदल पोचविण्याचा हा प्रयत्न असेल. यासाठी पुढाकार घेत "सकाळ'ने शिक्षण, शेती, ग्रामविकास, पायाभूत सुविधा, उद्योग अशी 16 क्षेत्रे निवडली आहेत. या सर्व क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागाताल्या व्यक्तींना जोडून घेत "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन' येत्या काळात विविध उपक्रम हाती घेणार आहे. 

मुंबईतील परिषद फक्त निमंत्रितांसाठीच खुली आहे. या विषयी अधिक माहिती http://www.deliveringchangeforum.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

"डिलिव्हरिंग चेंज फोरम'मध्ये सहभागी होणारे मान्यवर 
मलेशियाच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील "बीएफआर ("बिग फास्ट रिझल्ट') इन्स्टिट्यूट'चे व्यवस्थापकीय संचालक आणि "पेमाण्डू'चे मुख्य कार्यकारी अधिकारी दातोश्री इद्रीस जाला, व्हायटल कॅपिटलचे संस्थापक भागीदार इटन स्टिब, जागतिक स्तरावर सामाजिक, पर्यावरण आणि आर्थिक क्षेत्रांतील दीर्घकालीन हिताच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या "पॅलाडियम'चे ग्लोबल ब्रॅंड डायरेक्‍टर इस्तबान गोमेझ नदाल, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात मानदंड निर्माण करणाऱ्या झेडकेएम कार्ल्सऱ्हूचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. पीटर वेबेल, इस्राईलमधील उच्चशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आयडीसी हर्झालियाचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रा. उरील रीचमन, शाश्‍वत भविष्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या होरासिसचे अध्यक्ष डॉ. फ्रॅंक जुगेन रीचर, जागतिक कीर्तीचे तत्त्ववेत्ते व लेखक प्रा. पीटर सोतेर्जिक, प्रोग्रॅमर आणि थ्री डी शिल्प कलाकार याल गेवर, बर्लिन कला विद्यापीठातील डिझाइन रिसर्च लॅबच्या प्रमुख प्रा. गेख जूस, आयडीसी हर्झालियाचे रिसर्च अँड ग्लोबल एंगेजमेंटचे संचालक डॉ. एरीक झिमरमॅन, कार्ल्सऱ्हूच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तीन रिदेल, पॅलाडियमच्या स्ट्रॅटेजिक ग्रोथ अँड इनोव्हेटिव्ह डेव्हलपमेंट फायनान्सिंगचे प्रमुख पीटर व्हॅंडरवॉल, पॅलाडियमच्या थॉट लिडरशिप संचालक एदुआर्दो तुंदात, जर्मनीतील बाडेन उतेनबर्गच्या विज्ञान, संशोधन आणि कला मंत्रालयातील सचिव पेत्रा ओचोवस्की, स्वयंरोजगार करणाऱ्यांना "बिझनेस इनक्‍युबेटर' उपलब्ध करून देणाऱ्या "कॅटॅपुल्ट'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जोशुआ कॅब कोलिन्स, दक्षिण आफ्रिकेत विधायक कार्य करणाऱ्या ऍलन ग्रे आर्बिस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍन्थनी फार, तेल अविव महापालिकेचे चीफ नॉलेज ऑफिसर जोहार शेरॉन, स्नॅप बिल्डरचे सहसंस्थापक असाफ किंडलर, मस्केटियरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शाऊल अविदोव आणि पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार. 

"अपेक्षापूर्तीच्या दिशेने' 
"सकाळ'ने निवडलेल्या 16 क्षेत्रांत पुढे वाटचाल करताना दिसणाऱ्या अडचणी, त्यावरच्या संभाव्य उपाययोजना तसेच पुढच्या तीन वर्षांत या प्रत्येक क्षेत्रात कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायला हवे याचा विभागवार आढावा आजच्या अंकापासून.... 

Web Title: Change the situation in Maharashtra