#votetrendlive 'परिवर्तना'ला कौल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

शहरांसह ग्रामीण भागांत भाजपच; दोन्ही कॉंग्रेसना फटका
मुंबईत वाघाच्या काळजात "कमळ' घुसले

शहरांसह ग्रामीण भागांत भाजपच; दोन्ही कॉंग्रेसना फटका
मुंबईत वाघाच्या काळजात "कमळ' घुसले
मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांत भाजपच्या "पारदर्शक' कारभाराला मतदारांनी जोरदार पसंती देत मुख्यमंत्र्यांच्या "हा माझा शब्द आहे,' या वचनावर विश्‍वास ठेवत "परिवर्तन' करून दाखविले. दहा महानगरपालिकांसह राज्यातल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये भाजपची विजयी घोडदौड कायम राहिली असून, संसद ते पालिका व पंचायतींत सर्वत्र "कमळ' फुलले आहे.

"मिनी विधानसभा' मानलेल्या या निकालाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय दबदबा पुन्हा अधोरेखित झाला आहे. शिवसेनेला मात्र थोडा फटका बसला असला, तरी मुंबईत शिवसेनेचा महापौर आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

दहा महानगरपालिकांपैकी ठाणे वगळता इतर सर्वच महापालिकांत भाजपला महापौरपद मिळवण्याची संधी आहे. यापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक, अमरावती, अकोला व उल्हासनगरमध्ये भाजपलाच बहुमत मिळाले आहे. एकमेव मुंबईत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष असल्याने रस्सीखेच सुरू झाली आहे.

राज्यातील 26 जिल्हा परिषदा, त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या आणि दहा मोठ्या महापालिकांच्या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडल्या. या निवडणुकांत शिवसेना-भाजपची युती तुटल्याने त्यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली. या दोन्ही सत्ताधारी पक्षांतील दुफळीचा फायदा उठविण्यास दोन्ही कॉंग्रेस अपयशी ठरले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही जागा राखल्या असल्या तरी मनसेची होणारी घसरण सुरूच राहिली. शिवसेनेने भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले असताना मुंबई वगळता अन्य ठिकाणी शिवसेनेचे नुकसान झाले, तर 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने जबरदस्त यश मिळविले. मुंबई महापालिकेत भाजपला शिवसेनेपेक्षा केवळ चार-दोन जागा कमी मिळाल्या असल्या तरी नाशिकमध्ये भाजपने एकहाती सत्ता हस्तगत केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतही यश मिळवून भाजपने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गड उद्‌ध्वस्त केले. सोलापूर येथेही नेत्रदीपक विजय मिळवतानाच भाजपने उल्हासनगर, अकोला, अमरावती येथे उत्तम कामगिरी केली. नागपूर महापालिका एकहाती हस्तगत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वरचष्मा कायम ठेवला.

राज्यातील दहा महापालिकांपैकी आठ महापालिकांत भाजपने नेत्रदीपक यश मिळविले असून, सत्ता हस्तगत करण्याच्या स्थितीत भाजपची ताकद निर्माण झाली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 205 नगरसेवक असताना यंदा ही संख्या 470 वर जाऊन पोचली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेचे नुकसान झाले असून, दहा महापालिकांतील नगरसेवकांची संख्या 227 वरून 215 वर आली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच मनसेची जोरदार पीछेहाट झाली असून, कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या 264 वरून 99 पर्यंत घसरली. राष्ट्रवादी कॉंग्रेसही 265 वरून 108, मनसे 112 वरून फक्‍त 16 तर अन्य लहान-मोठे पक्ष 171 वरून 61 पर्यंत घसरल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे. काही ठिकाणचे निकाल अद्यापपर्यंत बाकी असून, अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत हाती लागण्याची शक्‍यता आहे. मात्र सायंकाळपर्यंत हाती आलेल्या निकालांवरून भाजपने शिवसेनेसह सर्व प्रमुख पक्षांना निष्प्रभ करत राज्यात "परिवर्तन' घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकांतील गेल्या वेळचे आणि सध्याचे बलाबल (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
- मुंबई ः भाजप-31-81, राष्ट्रवादी कॉंग्रेस-13-9, कॉंग्रेस-52-31, शिवसेना-75-84, मनसे-28-7
- ठाणे ः भाजप 8-17, राष्ट्रवादी कॉंग्रेस-34-26, कॉंग्रेस-18-2, शिवसेना-53-51, मनसे-7-0
- उल्हासनगर ः भाजप-11-33, राष्ट्रवादी कॉंग्रेस-20-4, कॉंग्रेस-8-1, शिवसेना-19-21, मनसे-1-0
- पुणे ः भाजप-26-77, राष्ट्रवादी कॉंग्रेस- 51-44, कॉंग्रेस- 28-16, शिवसेना-15-10, मनसे-29-6
- पिंपरी-चिंचवड ः भाजप-3-38, राष्ट्रवादी कॉंग्रेस- 83-19, कॉंग्रेस-14-0, शिवसेना-14-6, मनसे-4-0
- सोलापूर ः भाजप-25-47, राष्ट्रवादी कॉंग्रेस-16-3, कॉंग्रेस- 45-11, शिवसेना-8-18, मनसे- 00-00
- नाशिक ः भाजप- 14-51, राष्ट्रवादी कॉंग्रेस- 20-4, कॉंग्रेस- 15-6, शिवसेना- 19-33, मनसे- 40-3
- नागपूर ः भाजप- 62-58, राष्ट्रवादी कॉंग्रेस- 6-1, कॉंग्रेस- 41-19, शिवसेना- 6-00, मनसे- 2-00
- अमरावती ः भाजप-7-37, राष्ट्रवादी कॉंग्रेस-17-00, कॉंग्रेस-25-6, शिवसेना-10-4, मनसे-00-00
- अकोला ः भाजप-18-38, राष्ट्रवादी कॉंग्रेस-5-5, कॉंग्रेस-18-12, शिवसेना-8-4, मनसे-1-00

दहा महापालिकांतील घसरते संख्याबळ
- शिवसेना - 227 वरून 215
- कॉंग्रेस - 264 वरून 99
- राष्ट्रवादी कॉंग्रेस - 265 वरून 108
- मनसे 112 वरून 16

Web Title: changes in municipal election