जुन्या देणगी पावत्यांद्वारे भाविकांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील सिद्धेश्वर घायाळ या कर्मचाऱ्याने कालबाह्य झालेल्या जुन्या देणगी पावती पुस्तकाचा गैरवापर करून भाविकांकडून देणगी गोळा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील सिद्धेश्वर घायाळ या कर्मचाऱ्याने कालबाह्य झालेल्या जुन्या देणगी पावती पुस्तकाचा गैरवापर करून भाविकांकडून देणगी गोळा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकाराची मंदिर समितीने गंभीर दखल घेतली असून, समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांना दोन दिवसांत चौकशी करून समितीला चौकशी अहवाल द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सोमवारी दिली.

मंदिर समितीमध्ये वायरमन म्हणून काम करत असलेल्या घायाळ याने आषाढी यात्रा काळात मागील दहा ते बारा वर्षापूर्वीची जुनी पावती पुस्तके मंदिरातून चोरुन नेली होती. त्याच देणगी पावती पुस्तकातील पावत्या भाविकांना देऊन देणगी गोळा करत असल्याचा धक्कादायक प्रकार मंदिरातील पोलिस कर्मचारी वामन यलमर यांनी रविवारी (ता. 14) समोर आणला होता. त्यानंतर संबंधित कर्मचारी सिद्धेश्वर घायाळ याच्याकडे अधिक चौकशी केली असता, कालबाह्य झालेली दोन पुस्तके आणि भाविकांकडून गोळा केलेले 11 हजार रुपये जप्त केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating of the devotees by old donation receipts crime