Chhagan Bhujbal: थांबून करणार काय?,राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे भावनिक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal: थांबून करणार काय?,राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे भावनिक विधान

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या चर्चेत आले आहेत. पहिल्यांदाच भुजबळ यांनी तुरुंगातील अनुभवावर भाष्य केलं आहे. अडीच वर्षाच्या तुरुंगवासात काय केलं? याचा खुलासा त्यांनी केला आहे. (Chhagan Bhujbal said how he spent time in jail)

तुरुंगातील अनुभवावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, या अडीच वर्षाच्या काळात तुरुंगात फक्त पुस्तक आणि वर्तमान पत्र वाचण्याचं काम केलं. चिंतन केलं, मनन केलं, असं भुजबळ यांनी सांगितलं. छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने गौरव सोहळा आणि प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले भुजबळ?

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कभी डर ना था मुझे फासला देखकर. मै बढता गया रास्ता देखकर, ख़ुद ब ख़ुद मेरे नज़दीक आती गई, मेरी मंज़िल मेरा हौसला देखकर, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आपल्या आयुष्याचं मर्म सांगत या मुलाखतीला सुरुवात केली. आयुष्यात चढउतार असतात.

सुखदु:ख आहे. प्रत्येकाची दु:खं वेगळी असतील. त्याची कारणंही वेगळी असतील. पण घरोघरी मातीच्या चुली असतात तसं घरोघरी सुख आहे आणि दु:ख आहे. जे समोर येईल ते स्वीकारायचं. थांबून करणार काय? असा भावनिक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

चालत गेलो तर रस्ता मिळतो. थांबल्यावर कसा मिळेल. अडचणी येतात आणि जातात. आयुष्य असंच आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

तुरुंग म्हटल्यावर भीती वाटणं साहजिकच...

तुरुंग म्हटल्यावर भीती वाटणं साहजिकच आहे. अडीच वर्ष तुरुंगात राहावं लागतं तेव्हा तुरुंग काय आहे हे कळतं. तुरुंगात अडचणी असतात, दु:ख असतं, सर्व असतं. मला तुरुंगात पुस्तकं आणि वर्तमानपत्रांचं सहकार्य मिळालं, म्हणून मी तुरुंगात टिकू शकलो.

मी सकाळी सर्व वर्तमानपत्र वाचायचो आणि दुपारनंतर सर्व पुस्तके वाचायचो. त्यातच वेळ जायचा. त्यामुळे तेव्हा वाटायचं बरं झालं, नाहीतरी पुस्तकं वाचायला वेळ मिळत नव्हता.

पण त्या काळात मी आजारीही पडलो. तीन वेळा आजारी पडलो. एकदा तर तुरुंगात तापाने फणफणलो होतो. बेशुद्ध पडलो होतो. बॅरेकजवळ कधी रुग्णवाहिका आणली जात नाही. पण मी बेशुद्ध पडल्यावर आणली गेली. मला कधी हॉस्पिटलला नेलं तेही मला कळलं नव्हतं.

नंतर पॅनक्रियाचा आजार झाला. आमदार कपिल पाटील यांच्यासह अनेकांनी माझ्या आजारपणाबाबत विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर कोर्टानेही माहिती घेतली आणि माझ्यावर उपचार सुरू झाले. केईएमच्या डॉक्टरांनी माझ्यावर चांगले उपचार केले.

माझ्यासाठी वेगळी रुम दिली. माझ्यासाठी डॉक्टरांची एक टीम आली होती. त्या डॉक्टरांनी ठरवलं यांना वाचवायचंच. त्यामुळे मी तुमच्यासमोर आलो. असे सांगत मी या सर्वांचे आभारी असल्याचे त्यांनी म्हटलं.

तसेच, तुरुंगात असताना कधी कधी बाहेरच्यांची आठवण येते. भूतकाळातील आठवणी यायच्या. त्या आठवणीत रमायचो. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. त्यावेळच्याही आठवणी येत होत्या.आठवणीत रमणं झालं की पुन्हा वाचन करायचो. असा वेळ माझा तुरुंगात जायचा, असं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Chhagan Bhujbal