छगन भुजबळ यांची शिवसेनेसोबत जवळीक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 मे 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतल्याने भुजबळांची शिवसेनेसोबत जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतल्याने भुजबळांची शिवसेनेसोबत जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली दोन वर्षे कारागृहात असताना भुजबळ राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज होते. पक्षाने आपल्या सुटकेसाठी काहीही प्रयत्न केला नसल्याची खंत भुजबळांची आहे. दरम्यान, भुजबळांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी ठाकरे यांनी भुजबळांनी प्रकृतीची काळजी घेण्याचे सुचविले होते. भुजबळ सध्या लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज त्यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली. या दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. या चर्चेत नार्वेकर यांनी भजबळांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्याचे समजते. त्याचबरोबर दोघांमध्ये राजकीय चर्चाही झाल्याचे समजते.

भुजबळ यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे.

ट्‌विटरवर एंट्री
छगन भुजबळ यांनी ट्विटरवर एंट्री केली आहे. 'माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो, माझ्यावर विश्‍वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली, त्यामुळे मी आपला आभारी आहे, देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात, याची मला कल्पना आहे. माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे,'' अशा शब्दांत भुजबळ यांनी ट्‌विट करून कार्यकत्यांशी संवाद साधला.

Web Title: chhagan bhujbal shivsena relationship politics