शिवसेनेच्या पाठीशी भुज"बळ'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नाशिक - 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पक्षादेश मानून सर्व शिवसैनिकांनी झोकून देऊन काम केले. सगळ्यांच्या एकत्रित कष्टाचा हा विजय आहे. विरोधकांनी जातीयवाद केला, पण शिवसेनेची मते फुटली नाहीत. या यशात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचेही योगदान आहे, परवेझ कोकणी यांनीही रसद पुरविली होती,'' अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेल्या नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

येवल्याचे "होमपीच 2019'च्या सामन्यासाठी अधिक भक्कम करण्यासाठी भुजबळांनी राष्ट्रवादीला ही गुगली टाकल्याचे बोलले जाते. दराडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. शिवाजी सहाणे यांचा 167 मतांनी दणदणीत पराभव करत पहिल्यांदा "भगवा' फडकवला. या यशामुळे नाशिकमध्ये "आवाज शिवसेने'चाच राहिला. दराडेंना 399, तर ऍड. सहाणेंना 232 मते मिळाली. तिसरे उमेदवार अपक्ष परवेझ कोकणी यांना एकही मत मिळाले नाही.

सर्वत्र भगवामय जल्लोष
मतमोजणीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर श्री. बडगुजर व पांडे यांनी मतदान मोजणी केंद्रातून मुंबईला पक्षनेत्यांना दूरध्वनी लावून निकाल ऐकवला. श्री. दराडे विजयी झाल्याचे जाहीर होताच, शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार भगवामय जल्लोष सुरू केला. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाच्या उधळणीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रंगून गेले. कार्यकर्त्यांनी नरेंद्र दराडेंना उचलून आवाराबाहेर नेले.

ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, राज ठाकरे यांनी उमेदवारीची संधी दिली. माझ्या विजयासाठी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते झटले. सर्वांचे आभार मानतो. मला पाठिंबा दिलेल्या भाजपचेही आभार मानतो. पराभव स्वीकारला आहे, पण हा पराभव जनशक्तीकडून नव्हे, तर धनशक्तीकडून झालेला आहे.
- ऍड. शिवाजी सहाणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार

Web Title: chhagan bhujbal support to shivsena politics