
Crime News: 'छत्रपती संभाजीनगर' नामांतराचं स्टेटस ठेवलं; तरुणाला कुटुंबीयांसह टोळक्याची मारहाण
Chhatrapati Sambhajinagar: औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्यानंतर सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. मात्र नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण केलं. त्यातच बीड जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर नामांतराचं स्टेटस ठेवल्याने मारहाण करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर नामांतराचे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यामुळे, 20 ते 25 विशिष्ट गटाच्या युवकांनी तरुणावर घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात ही घटना घडली. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव रुपेश गायकवाड आहे. याबाबत साम टिव्हीने वृत्त दिलं आहे.
रुपेशच्या घरावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे घराच्या काचाही तुटल्या आहेत. ही घटना रात्री 11 ते 12 च्या दरम्यान घडली आहे. रुपेशवर हल्ला करणाऱ्यांमध्ये ओळखीच्या १० तर अनोळखी १५ तरुणांचा समावेश होता. हल्लेखोरांनी रुपेशच्या कुटुंबीयांना देखील मारहाण केली. रुपेशने त्याच्या मित्राचे छत्रपती संभाजीनगर नामांतराचे स्टेट्स डाऊनलोड करून आपल्या व्हॉटसअपवर ठेवलं होतं.