विधानसभेच्या कँटिनमध्ये मटकीच्या उसळीत चक्क चिकनचे तुकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे हे जेवन करत असताना त्यांना मटकीच्या उसळीमध्ये चक्क चिकनचे तुकडे आढळून आले.

मुंबई : विधान भवनमध्ये आज (बुधवार) एक धक्कादायक प्रकार घडला. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे हे जेवन करत असताना त्यांना मटकीच्या उसळीमध्ये चक्क चिकनचे तुकडे आढळून आले. सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे विधान भवनच्या कँटिनमध्ये नेते, अधिकारी वर्गातील अनेकजण जेवण करण्यासाठी जात असतात. मात्र, आज या घटनेमुळे विधानभवन परिसरात एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली.
 
मनोज लाखे यांनी विधानसभेचे सचिव जितेंद्र भोळे यांना घडलेला प्रकार सांगितला. आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात तक्रार केली. सदर कँटिन हे निष्काळजीपणे चालविले जात असून कँटिनच्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी लाखे यांनी या वेळी केली. 

कँटिनचे पर्यवेक्षक रविंद्र नागे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून लाखे यांची माफी मागितली. सदर प्रकार अनवधानाने घडल्याचे नागे यांनी या वेळी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chicken pieces found in Veg food at Canteen of Vidhan Sabha Mumbai

टॅग्स