मुख्यमंत्रिपदावरून बॅनरबाजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

राज्यात भाजपविरहित सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याने मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेतील नेत्यांची इच्छा ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी असली; तरी युवासेनेतील पदाधिकाऱ्यांनी मात्र आदित्य ठाकरेंच्या नावाला पसंती दिली आहे.

शिवसेनेला उद्धव, तर युवासेनेला हवेत आदित्य
मुंबई - राज्यात भाजपविरहित सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याने मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेतील नेत्यांची इच्छा ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी असली; तरी युवासेनेतील पदाधिकाऱ्यांनी मात्र आदित्य ठाकरेंच्या नावाला पसंती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंना पुढे केले होते. तशा प्रकारची घोषणादेखील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केली होती. ‘मातोश्री’सह मुंबईतील अनेक ठिकाणी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करणारे फलक युवासेनेकडून लावण्यात आले. ‘मातोश्री’बाहेर ‘युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार’ असे बॅनर लावल्यानंतर आता ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत’ असे बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत.

यामुळे मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचे दिसत आहे. शिवसेना युतीमधून बाहेर पडून सरकार स्थापन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. यामुळे शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. यामुळे पक्षांतर्गत बंडाळी वाढण्याची शक्‍यता आहे. संभाव्य बंडाळी रोखण्यासाठी पक्षाने आधी आदित्य आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशा आशयाचे फलक लावले असण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chief minister banner shivsena politics