मुख्यमंत्र्यांची पॉवरफुल खेळी; बारामतीचे पाणी रोखले

मुख्यमंत्र्यांची पॉवरफुल खेळी; बारामतीचे पाणी रोखले

मुंबई - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कोंडी केली आहे. नीरा-देवघर धरणाचे बारामतीला जाणारे पाणी रोखण्याचे आदेश राज्य सरकारने आज जारी केले. 

"नीरा-देवघर' प्रकल्पाच्या डावा कालव्यातून बारामतीला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आता नीरा कालव्यातून फलटण आणि माळशिरस या तालुक्‍यांत हे पाणी जाणार आहे. याबाबत जलसंपदा विभागाने आदेश काढला आहे. या निर्णयाचा फटका बारामतीशेजारील इंदापूर या तालुक्‍यालाही बसणार असल्याने आगामी काळात हा पाणी प्रश्न आणखीनच पेटू शकतो. 

"वीर-भाटघर' धरणाच्या उजवा कालव्याद्वारे 57 टक्के, तर डावा कालव्याद्वारे 43 टक्के पाणीवाटपाचे धोरण 1954 च्या पाणीवाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजवा कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्‍यांना पाणी मिळत होते. डावा कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्‍याला पाणी मिळत होते. 4 एप्रिल 2007 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात स्वतःची राजकीय ताकद वापरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन 2009 मध्ये पाणीवाटपाचा करार बदलला होता. 

असा झाला करार 
या करारान्वये नीरा-देवघर धरणातून 60 टक्के पाणी डावा कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्‍याला; तर 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्‍याला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतच करण्यात आला होता. विधान परिषदेचे सभापतिपद मिळाल्याने रामराजे नाईक निंबाळकर यांनी या कराराला विरोध न करता संमती दिली होती. तसेच, रामराजे स्वतः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी विरोध करण्याचा प्रश्‍नच उपस्थित होत नव्हता. 3 एप्रिल 2017 ला हा करार संपल्यानंतरही हे पाणी बारामती व इंदापूर तालुक्‍याला दिले जात होते. 

दुष्काळाचे राजकारण नको 
बारामती व इंदापूरला जाणारे पाणी बंद करून ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्‍यांना मिळावे, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. यानंतर दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे राजकारण न करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले होते. तर, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी, "हक्‍काचे पाणी मिळविण्यात कसले आले राजकारण,' असे प्रत्युत्तर पवार यांना दिले होते. दुष्काळी परिस्थितीसंदर्भात शरद पवार आणि अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. या वेळी नीरा-देवघरच्या पाण्यासंदर्भातही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com