भारतीय राजकारणातील झंझावाती व्यक्तिमत्त्व हरपले- देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे

मुंबई - माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात श्रीमती स्वराज भारतीय राजकारणातील एक खंबीर नेतृत्व होते. गेल्या पन्नास वर्षांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी संसदीय राजकारणात  स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध विभागांचा कार्यभार त्यांनी जबाबदारीने सांभाळला होता विशेषत: एका महत्त्वाच्या कालखंडात त्यांनी पाच वर्षे परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली होती. यासोबत अटलजींच्या मंत्रिमंडळातही त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण, सूचना आणि प्रसारण मंत्रालय अशा विभागांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळताना आपल्यातल्या निष्णात संसदपटूची प्रचीती आणून दिली होती. अत्यंत तरुण वयात राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या सुषमाजींनी हरियाणाच्या मंत्रिपदासह दिल्लीचे मुख्यमंत्रीपदही भूषवले होते. एक श्रेष्ठ विधिज्ञ , साहित्यप्रेमी, प्रभावी वक्त्या, अभिजात रसिक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही विशेष पैलू होते. त्यांच्या निधनाने आपण ज्येष्ठ नेत्या आणि मार्गदर्शक गमावल्या आहेतच पण त्यासोबत माझीही वैयक्तिक हानी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis has tribute to the death of former Union Minister Smt. Sushma Swaraj