Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली शिवसेना खासदारांची तातडीची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली शिवसेना खासदारांची तातडीची बैठक

शिवसेना खासदारांची तातडीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी ही बैठक सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी फक्त खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यामुळे बैठकीत काय मोठी रणनीती ठरवली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन व्यूहरचना आखली जाणार असल्याचं समोर आलं आहे. मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा देखील घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सुप्रीम कोर्टातील निकाल आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आणलेल्या हक्कभंग राज्यसभेत त्यावर हरकतींबाबतही चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून खासदारांना जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या खासदारांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या सभा घेण्यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बैठकीचा तपशील कुणालाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.