युतीशिवाय लढण्यास "दक्ष' राहा - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई  - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेशी युती करण्याची आमची इच्छा आहे; मात्र तसे न झाल्यास या निवडणुकांत पक्षाला विजयी करण्यासाठी तयार राहा, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. 

मुंबई  - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेशी युती करण्याची आमची इच्छा आहे; मात्र तसे न झाल्यास या निवडणुकांत पक्षाला विजयी करण्यासाठी तयार राहा, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. 

पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी मुंबईत भाजपच्या जिल्हाध्यक्षांची, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या सभेत फडणवीस आणि दानवे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी "दक्ष' राहण्याच्या सूचना केल्या. राज्यातील राजकीय वातावरणाचा आढावा घेतानाच आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बुथरचना सक्षम करण्याचा संदेशही या वेळी देण्यात आला. 

कार्यकर्त्यांनी निवडणुका लढण्यास तयार राहावे. त्यादृष्टीने गावागावांत संपर्क वाढवावा. दलित वस्त्यामंध्ये प्रचारासाठी जावे, तेथे मुक्‍काम करावा, पक्षाची मते वाढवणाऱ्यास मदत होईल, असे कार्यक्रम हाती घ्यावेत, अशा सूचनाही या वेळी देण्यात आला. 

बैठकीच्या पहिल्या सत्रात झालेल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत विभागवार आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत बुथरचना, निवडणुकांची तयारी, देशातील परिस्थिती आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. 

रात्री उशिरा पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. शिवसेनेच्या नवीन भूमिकेबाबत या वेळी चर्चा झाली. शिवसेनेने युतीस नकार दिल्यास चित्र कसे असेल, यावरही चिंतन झाल्याचे समजते. 

भाजप-शिवसेनेची युती सैद्धांतिक आहे. त्यामुळे शिवसेना वेगळा निर्णय घेणार नाही, अशी अपेक्षा आहे. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री. 

आम्हाला शिवसेनेची सोबत हवी आहे; मात्र ते सोबत न आल्यास आम्ही निवडणुका जिंकण्यासाठीच लढू. 
- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप. 

Web Title: Chief Minister & Raosaheb danwe Notice to party workers