मुख्यमंत्र्यांचा भर सर्वाधिक कमळे फुलवण्यावर

- मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 21 जानेवारी 2017

निम्म्या जागांसाठी भाजपचा आग्रह; शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांकडे लक्ष

निम्म्या जागांसाठी भाजपचा आग्रह; शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांकडे लक्ष
मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत सर्वाधिक कमळे फुलवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय असून त्यासाठी शिवसेनेने 110 ते 115 जागा द्याव्यात, असा त्यांचा आग्रह असेल. भाजपसाठी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांनी नरेंद्रप्रणीत विकासाचे देवेंद्र संचालित मॉडेल महाराष्ट्रातील मुंबईसह सर्व शहरवासीयांना हवेसे वाटत असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे शिवसेनेशी सौख्य सांभाळणारे फडणवीसही निम्म्या जागांच्या मागणीवर ठाम राहणार असल्याचे समजते.

वस्तुस्थिती लक्षात घेत जागांची निम्मी-निम्मी वाटणी मान्य करा, असा निरोप ते लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्याची शक्‍यता आहे. हिंदुत्ववादी शक्‍तींनी एकत्र राहावे, या मताचा आग्रह धरणाऱ्या फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्‍त राजकारणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला दूर ठेवून शिवसेनेला आग्रहपूर्वक सरकारमध्ये सामील करून घेतले होते. आता याच सौहार्दपूर्ण वागणुकीचा हवाला देत जागावाटपात उदारपणा दाखवा, असे आवाहन ते करण्याची शक्‍यता आहे. नगरपालिका निवडणुकांतील यशानंतर केंद्रीय भाजपने युतीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर सोपवला आहे.

मुंबईच्या रिंगणात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतला तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असे भाकीत पाहणीच्या आधारावर केले जात आहे. पालकमंत्री विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार निम्म्या जागांचा आग्रह धरत आहेत. युतीसंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस यांनी कमालीचे मौन बाळगले असल्याने दोन्ही नेते त्यांचा अदमास घेत आहेत.

राज्यात सर्वत्र युतीची चर्चा ठप्प
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर दाखवलेल्या अविश्‍वासानंतर मुंबई, पुणे, नाशिक या सर्व ठिकाणची जागांच्या देवाणघेवाणीची चर्चा थांबली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच आता भूमिका स्पष्ट करावी, असे म्हणत शुक्रवारी शिवसेनेने कोणतीही चर्चा केली नाही.

Web Title: Chief Minister stressed the most kamal