शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार कर्जमुक्तीचे पैसे खात्यात जमा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. या सरकारने शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दिली आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पुढचा टप्पा वितरित करण्यास मान्यता दिली असून त्याचा आदेश प्रसिद्ध केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. या सरकारने शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दिली आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पुढचा टप्पा वितरित करण्यास मान्यता दिली असून त्याचा आदेश प्रसिद्ध केला आहे. 
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत 2334 कोटी रुपये निधी वितरीत करण्यात सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील तब्बल तीन लाख 53 हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे संकट राज्यात धडकल्यानंतर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाही फटका बसला होता. मात्र आता कर्जमाफीचा उरलेला टप्पा पुन्हा पुरवला गेला आहे. शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राज्य सरकारने जाहीर केली होती. यात 20 हजार 250 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. त्यात 30 लाख 40 हजार शेतकरी पात्र ठरले. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये 19 लाख शेतकऱ्याच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडल्याने सलग रक्कम देता आली नव्हती. उर्वरित 11 लाख शेतकऱ्यांपैकी 30 जून रोजी 1 लाख 34 हजार शेतकऱ्यांसाठी शासनाने रु. 1050 कोटी वितरित केले आहेत. आज उर्वरित 2334 कोटी रुपयांची रक्कम 3.53 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
१ एप्रिल २०१५ ते ३ मार्च २०१९ पर्यंत अल्पमुदतीचे कर्ज घेतलेल्या व पुनर्गठन केलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १०५० कोटी निधी वितरीत करण्यात आला होता. मात्र आणखी निधी वितरीत करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी सात हजार कोटीची तरतुद सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. यातून वितरीत केलेला निधी सोडून २३३४ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा सरकारने आदेश काढला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray has approved spending on farmers loan waiver money