धक्कादायक! पाणी समजून प्यायले ऍसिड; तीन वर्षीय बालक दगावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

- तहान लागली अन् पाण्याऐवजी प्यायले अॅसिड.

सोलापूर : विजयादशीमचा दिवस...तीन वर्षांचा संजय आईसोबत मटण आणण्यासाठी मटण दुकानात गेला...तिथे तहान लागली म्हणून सुरजने बाटली उचचली आणि तोंडाला लावली...पाणी समजून त्याने ऍसिड प्यायले..! यात जखमी संजयचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

संजय लुकेश कुचेकर (वय 3, रा. अलकुंटे चौक, सोलापूर) असे मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास संजय हा आईसोबत शास्त्रीनगर येथील मटन दुकानात मटन आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी तहान लागली म्हणून सुरजने दुकानात ठेवलेली बाटली उचलली. पाणी समजून त्याने बाटलीतील ऍसिड पिले. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने आई रडतच घरी आली. शेजारी राहणाऱ्या मनोज साखरे यांनी सुरजला शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना बुधवारी दुपारी संजयचा मृत्यू झाला. 

केंद्राची दिवाळी भेट; शेतकऱ्यांना दिलासा

संजयचे वडील लुकेश हे बिगारी काम करतात. तीन वर्षांच्या बाळाच्या मृत्यूनंतर कुचेकर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विजयादशमीच्या उत्साहात ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद सदर बझार पोलिसात झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Child died After Drinks Acid in Solapur