मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे पालकांची जबाबदारी - उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

मुंबई - पब्जीसारख्या मोबाईल गेमपासून मुलांना सुरक्षित ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. पालक आपल्या मुलांना आयफोनसारखे महागडे फोन का देतात, त्यांना पासवर्ड लावून ते सुरक्षित का ठेवले जात नाहीत, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने पालकांचे कान टोचले आहेत. केंद्र सरकारने पब्जीबाबत पाहणी करून आवश्‍यकता वाटल्यास योग्य ती कारवाई संबंधितांवर करण्याचे निर्देश न्यायालयाने या वेळी दिले.

लहान मुलांमध्ये प्रचंड वेड निर्माण झालेल्या पब्जीच्या विरोधात 11 वर्षीय अहद निजाम या विद्यार्थ्याने न्यायालयात याचिका केली आहे. शुक्रवारी मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. पब्जीमधील खेळ हिंसक आणि भाषा शिवराळ असते. मुलांमध्ये याबाबतचे व्यसन वाढत चालले असून, यावर तातडीने नियंत्रण आणणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शाळांमध्ये यावर बंदी आणावी, अशी मागणी याचिकादाराच्या वतीने ऍड. तनवीर निजाम यांनी केली. मात्र राज्य सरकारच्या वतीने ऍड. पूर्णिमा कंथारिया यांनी यास विरोध केला.

केंद्र सरकारकडे याबाबत अधिकार आहेत. त्यांनी याचिकेतील मुद्द्यांनुसार पाहणी करावी आणि आवश्‍यकता वाटल्यास योग्य ती कारवाई करावी, असे आदेश खंडपीठाने दिले. याचिकेवरील पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे.

Web Title: Child Mobile Parent Responsibility High Court