children day
children day

दप्तराच्या ओझ्याला बाय-बाय!

आज बालदिन! मुलांचा दिवस. हे औचित्य साधून ‘सकाळ’ने  मुलांच्या नजरेतून त्यांचे भावविश्‍व जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या अंकाचे अतिथी संपादक आहेत उद्याचे सजग नागरिक! ‘सकाळ एनआयई’ च्या निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन बातमी, लेखाचा प्रवास समजून घेतला आणि संपादकाच्या भूमिकेत जाऊन हे विशेष पान तयार केले. लेखाच्या विषय निवडीपासून ते अंकाच्या सजावटीपर्यंत मुलांनी हिरिरीने भाग घेतला. लेखासाठी पूरक चित्रे, छायाचित्रेसुद्धा मुलांचीच आहेत! मुलांचे हे पान ‘सकाळ’च्या वाचकांना आणि बालगोपाळांना निश्‍चितच आवडेल, याची खात्री आहे! 

बालदिनानिमित्त छोट्या दोस्तांना खूप खूप शुभेच्छा!

आम्ही आजकालचे विद्यार्थी पायाला भिंगरी लावल्यासारखे दिवसभर पळतच असतो. रोज सकाळी आम्हाला खेळण्यासाठी मैदानावर जायचं असतं, तिथून पुढं ठरलेल्या वेळेत शिकवणी गाठायची असते, शिकवणी संपते न् संपते तोपर्यंत शाळा भरण्याची वेळ होते, मग पुन्हा घरी न जाता आम्ही थेट शाळा गाठतो. आमचा हा दिनक्रम नित्याचाच झाला आहे. ही तारेवरची कसरत करणं सोपं व्हावं म्हणून मग आम्ही शक्कल लढवतो. सकाळी घरातून निघतानाच खेळासाठी मैदानावर घालायचे कपडे, खेळाचं साहित्य, शिकवणीच्या वह्या-पुस्तकं, शाळेच्या वह्या-पुस्तकं, डबा, पाण्याची बाटली हे सगळं घेऊन घराबाहेर पडतो. यामुळं आमच्या वेळेची बचत होत असल्याचं समाधान आम्हाला वाटतं; पण एक दिवस आमच्या पाठीचा कणा बोलू लागतो, ‘बस, यापुढं ही परवड मी नाही सहन करू शकणार!’ मग आम्हाला जाणीव होते, या स्पर्धेच्या युगात पुढं जाण्याच्या नादात आम्हीच आमच्या शारीरिक आरोग्याकडं दुर्लक्ष करत आहोत. यावर एकच उपाय, तो म्हणजे आमच्या पाठिवरच्या दप्तराचं ओझं कमी झालं पाहिजे. पण ते कसं शक्‍य आहे? विचार केल्यावर जाणवलं, हो हे शक्‍य आहे.

सकाळच्या वेळेचं आम्ही योग्य नियोजन करू शकतो. खेळ, शिकवणीच्या वेळा जुळवून मधल्या वेळात नियमित घरी गेल्यास अर्ध ओझं कमी होईल. दररोजच्या वेळापत्रकानुसार दप्तर भरलं, तर अनावश्‍यक पुस्तकांचं ओझं होणार नाही. शब्दकोश, गोष्टीची पुस्तकं दप्तरातून शाळेत नेण्यापेक्षा शाळेतील ग्रंथालयाचा वापर आपण करू शकतो. शिक्षकांनी ठरवून दिलेल्या दिवशीच गृहपाठ, निबंध वह्या शाळेत घेऊन जाव्यात. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शाळादेखील प्रयत्न करत आहेत. आम्हाला एका दिवसात आठ विषय शिकवले जातात. प्रत्येक विषयाला घड्याळी तासाप्रमाणं अर्धा तास वेळ असतो. त्याऐवजी एका विषयाला एक तास देऊन चार किंवा पाचच विषय शिकवले गेले तर त्या-त्या विषयाचं पूर्ण आकलन होईल, तसंच पुस्तकांचं ओझंही कमी होईल. 

आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात शिकवण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक साधनांचादेखील उपयोग होत आहे. ई-लर्निंगमुळं शिक्षण अधिक आनंददायी होत आहे. आम्हा विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड देखील निर्माण होत आहे. मला सांगायला आनंद वाटतो की, आमच्या शाळेतदेखील आम्हाला ई-लर्निंगच्या माध्यमातून शिकवतात... तुम्हीही तुमच्या शिक्षकांना हा पर्याय सुचवू शकता. 

बालदिवशी बालकांसाठी 

चला काही करूयात

फक्त दप्तराचं ओझं

आणखी कमी करूयात...

तुमची स्वप्नं आमच्यावर लादू नका!

दिवाळीच्या सुटीत आम्ही मामाच्या गावाला गेलो होतो. तिथं आम्ही खूप खेळलो, मजा केली आणि चित्रपट देखील पाहिले. मी ‘तारें जमी पर’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट अतिशय उत्कृष्ट असून, त्यात ‘डिस्लोक्‍सिया’ हा आजार असलेला मुलगा दाखविला आहे. सुरवातीला सर्व शिक्षक, तसंच त्याचे आई-वडील त्याला काही जमत नसल्यानं त्याच्यावर नाराज असतात. परंतु, त्याला समजून घेणारे शिक्षक मिळतात, तेव्हा त्याचा आत्मविश्‍वास वाढतो. त्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्याची संधी मिळते. एका स्पर्धेत तो त्याच्या गुरूपेक्षाही उत्तम चित्र काढतो आणि पहिला क्रमांक पटकावतो. 

हा चित्रपट पाहून माझ्या मनात अनेक प्रश्‍न दाटून आले. वाटलं, मी आणि माझ्या मैत्रिणीही याच दबावाखाली जगत आहोत. माझी जवळची मैत्रीण प्रियांका खेळामध्ये रममाण होते. तिचे वडील डॉक्‍टर आहेत. प्रियांकाला खेळण्यात रस असला; तरी आपल्या मुलीनंदेखील डॉक्‍टरच व्हावं, अशी त्यांची इच्छा आहे. मला वाटतं, पालकांनी आम्हा पाल्यांमधील गुण ओळखले पाहिजेत. आवडीच्या क्षेत्रात पुढं जाण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. नृत्य, क्रीडा, वक्‍तृत्व, चित्रकला या कलांबद्दल दुराग्रह न बाळगता, मुलांना त्यांच्या विश्‍वात रमण्याची संधी दिली पाहिजे. 

लता मंगेशकर, साक्षी मलिक, ललिता बाबर यांच्या आई-वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलंच नसतं, तर त्या यशाचे शिखर कधीच गाठू शकल्या नसत्या. मुलांना ज्या क्षेत्रात रुची आहे, त्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी द्या. विश्‍वास ठेवा की, तो आपल्या आवडत्या क्षेत्रात नक्कीच यशाचे शिखर गाठेल.

‘तीन स्क्रीन’चा वापर विवेकी हवा

आज जगातील सगळेच देश ‘स्मार्ट’ होत आहेत. या स्मार्ट देशांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचं प्रमाण बेसुमार वाढत आहे. आजोबांपासून नातवापर्यंत सारेच जण ‘तीन स्क्रीन’रुपी ई-राक्षसाच्या जाळ्यात अडकत आहेत. तुम्हाला प्रश्‍न पडला असेल, ‘तीन स्क्रीन’ म्हणजे नक्की काय? तर टीव्ही, संगणक आणि आताचा स्मार्टफोन या तीनही इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंना स्क्रीन असते, म्हणून यांना ‘तीन स्क्रीन’ असं म्हटलं. आम्ही विद्यार्थी शाळेतून घरी येतो तेव्हा टीव्ही पाहतो किंवा संगणक, स्मार्टफोनवर गेम खेळत बसतो. शहरात मैदानंच नसल्यानं आमची पिढी हे खेळ विसरूनच गेली आहे. यामुळंच हे तिन्ही स्क्रीन मनोरंजनाच्या नावाखाली आम्हाला व्यसन लावत आहेत. जास्त वेळ या ‘तीन स्क्रीन’चा वापर केल्यास यामधून येणारा प्रकाश आपल्या डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतो. संगणकावर किंवा स्मार्टफोनवर गेम खेळायला व चॅटिंग करायला मुलांना आवडतं. मात्र, यामुळं मनावरही खूप परिणाम होत आहेत. इंटरनेटमुळं लहान वयातच मुलांना नको ती माहिती मिळते. त्यांच्यामध्ये नकारात्मक भावना वाढीला लागते. मेंदूवर वाईट परिणाम होतो.

वास्तविक, टीव्हीचा उपयोग आपल्याला मनोरंजनासाठी आणि ज्ञान वाढवण्यासाठी होऊ शकतो. संगणकामधील ‘गुगल’च्या मदतीनं जगातील हवी ती माहिती आपण बसल्याजागी मिळवू शकतो. फेसबुक, ई-मेलच्या मदतीनं इतरांशी बोलू शकतो. स्मार्टफोनचा वापर फक्त तातडीचा निरोप देण्यासाठी करू शकतो; पण हे वापर एका ठराविक मर्यादेपर्यंतच झाले पाहिजेत. याचा अतिवापर आपल्यासाठी शाप ठरू शकतो, हे लक्षात ठेवा. आजपासून आपण या ‘तीन स्क्रीन’चा मर्यादित वापर करून आपण विवेकवादी असल्याचं सिद्ध करूयात!

भारतीय मातीतील खेळ

मैदानी खेळांच्या विश्‍वात जास्तीत जास्त मुलांचा प्रिय खेळ क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन असल्याचं दिसून येतं. या खेळांमध्ये नक्कीच शारीरिक व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्याचा योग्य समतोल राखला जातो. परंतु, सर्व स्तरांतील मुलांना आनंद देणारे आणि कमी खर्चिक असणारे खेळ म्हणजे भारतीय मातीतील खेळ... भारतीय खेळांना जास्त साधनसामग्री लागत नाही व कुठेही खेळता येतात. काठीनं जमिनीवर चौकटी आखून काच पाणी खेळता येतं. जमिनीवर काठीनं दोन भाग करून लंगडी, कबड्डी, खो-खो असे खेळ खेळले जातात. दुपारच्या वेळी सुरपारंब्यासारखे खेळ रंगू लागतात. कधी कधी घराच्या अंगणात लगोरीचा खेळ रंगतो. भारतात जन्मलेले हे सर्व खेळ केवळ आनंदच देत नाहीत, तर शारीरिक ताकद, चपळता, साहस, धाडसी, इच्छाशक्ती, ध्येय हे सर्व गुणही देतात. आज प्रो-कबड्डी, प्रो-रेसलिंग या स्पर्धांमार्फत खेळांची लोकप्रियता वाढली असली; तरी वैयक्तिक पातळीवर क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळांबरोबरच खो-खो, कबड्डी, लंगडी, लगोरी, विटीदांडू, कुस्ती यांसारख्या देशी खेळांचा आपण आनंद घेतला पाहिजे. ऑलिंपिकसारख्या अग्रस्थानी स्पर्धांमध्ये भारतीय खेळांचा समावेश झाला, तर ही गोष्ट भारतासाठी अभिमानास्पद ठरेल.

कोमेजले बालपण!

‘रम्य ते बालपण’ म्हणून आपण एकीकडे बालपणाचा गौरव करतो, अन्‌ दुसरीकडे ‘बाल’ असलेल्या मुलांनाच कामाला जुंपलं जातं. या बालकांचं बालपण ‘रम्य’ कसं असणार? ‘बालकामगार’ हा शब्दच मुळात विसंगत वाटतो. वास्तविक पाहता बालकांना कोणत्याही कामाला जुंपण्याला कायद्यानं बंदी आहे. तरी अजूनही आपल्या देशात बालकांच्या शिकण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांना कामाला जुंपलं जातं. शिक्षणाचा मूलभूत अधिकारच त्यांना मिळाला नाही, तर त्यांचा विकास कसा होणार, हे सोईस्कररीत्या विसरतो. ही मुले या वयात काम करताना दिसतात, याचे मुख्य कारण म्हणजे दारिद्र्य. घरातील गरिबीमुळे या मुलांना लहानपणापासून कामे करावी लागतात. कुणी हॉटेलमध्ये टेबल पुसू लागतात, कुणी घरकाम करतात, कुणी छोट्या-मोठ्या कारखान्यात राबत असतात तर कुणी फटाक्‍यांच्या कारखान्यात काम करतात. अनेकदा हॉटेलमध्ये दिसणारी ‘येथे बालकामगार काम करत नाहीत’ ही पाटीदेखील बालकामगारच लावत असावेत, अशी शंका येते. 

घरातील एका माणसाची मिळकत संपूर्ण कुटुंबाची भूक भागवण्यास समर्थ नसते, त्यामुळे घरातील सर्वांनाच कष्ट करावे लागतात. मुंबईसारख्या शहरात रेल्वे स्थानकाच्या फलाटावर वा पदपथावर राहणारी, कष्ट करून जगणारी हजारो मुले आहेत. त्यांनादेखील आपल्या आई-वडिलांना समाजात मान मिळावा, अशी इच्छा होतच असेल! कदाचित या हेतूनेच ते आपल्या कुटुंबासाठी सतत झटत असतात. परंतु समाजातील स्वार्थी लोक या बालकांना आमिष दाखवून त्यांच्याकडून वाईट कामं करून घेतात. ही समस्या आजकाल गंभीर रूप घेत आहे. यासाठी आपणच पुढं आलं पाहिजे. काही सामाजिक संस्था हे काम करत आहेतच; पण शक्‍य असेल तर आपणही त्यांना यथायोग्य मदत केली पाहिजे. तरच या देशातील बालमजुरी हद्दपार होण्यास मदत होईल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com