
Chinchwad By Poll Election: पोटनिवडणुकीला गालबोट; चिंचवडमध्ये मतदानादरम्यान राडा
कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीला गालबोट लागले आहे. चिंचवडमध्ये मतदानादरम्यान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. येत्या 2 मार्च रोजी निवडणूक निकाल लागणार आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. या निवडणुकीत घोडेबाजार सुरू असल्याने त्याअनुषंगाने 14 पथकं तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपळे गुरव मतदान केंद्रावर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांचे समर्थक एकमेकांना भिडले. दोन्ही समर्थकांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. त्यामुळे मतदान केंद्रावर तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर समर्थकांमधील वाद मिटला.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत नागरिक माझ्या बाजूने आहेत, असा विश्वास राहुल कलाटे यांनी यावेळी व्यक्त केला. मी नेहमी साहेबांना मतदान करायचे, आज मी स्वत:ला मतदान केले. त्यावेळी मनाला थोडसं वेगळं वाटलं. दरवेळी साहेब असायचे, मी त्यांना मतदान करायचे, पण आज स्वत:ला मत देतेय, या भावनेने मनाला हुरहुर वाटली, अशी भावूक भावना अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 255 मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून तर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन मधील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहेत.