शहरे, खेड्यांच्या विकासासाठी स्मार्ट दृष्टिकोन हवा

शहरे, खेड्यांच्या विकासासाठी स्मार्ट दृष्टिकोन हवा

मुंबई - स्मार्ट सिटी म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर अशी चुकीची समजूत रूढ झाली आहे. वास्तविक तंत्रज्ञान हे केवळ माध्यम आहे, कमीत कमी साधनसंपत्तीचा वापर करून समस्यांवर तोडगा शोधणे, कमीत कमी लोकांना झळ बसून मोठा परिणाम साधणे, केवळ आजच्याच समस्यांवर नव्हे तर भविष्याचा वेध घेऊन त्या प्रश्नांवर उत्तरे शोधणे म्हणजे स्मार्ट सिटी. भारतात ग्रामीण भागांत परंपरागत ज्ञानाचा मोठा ठेवा आहे. त्याला पिकाच्या लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्वसमावेशक दृष्टी आणि टीमवर्कची जोड दिली तर स्मार्ट व्हिलेज आकारास येतील. शेतकरी कुटुंबाचा उत्कर्ष, आर्थिक प्रगती आणि गुंतवणूक या तीन निकषांवर स्मार्ट व्हिलेजचा परिणाम जोखायला हवा, असा सूर `हाऊ टु डेव्हलप स्मार्ट सिटीज अँड स्मार्ट व्हिलेजेस` या चर्चासत्रात उमटला.

चर्चासत्रात इस्राईलमधील तेल अवीव महानगरपालिकेचे मुख्य ज्ञान अधिकारी जोहर शेरॉन, पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल कुमार, जेथ्रो लिमिटेड या कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गबी नेहम, जेथ्रोचे जोनाथन स्पेन्सर, डीसीएफ अॅडव्हायझरीचे संचालक बॉबी निंबाळकर सहभागी झाले होते. डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष अभिजित पवार यांनी या वक्त्यांशी संवाद साधला.

कुणाल कुमार म्हणाले की, दिल्ली शहरात वाहतुकीसाठीच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीवर एक लाख कोटींचा खर्च करूनही दळणवळणाची गती अल्प प्रमाणात वाढली. स्मार्ट सिटीमध्ये हे अपेक्षित नाही.  स्मार्ट सिटींच्या यादीत पुण्याने देशात दुसरा क्रमांक पटकावला, हा प्रवास रोमहर्षक असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणेकर नागरिक, इतर सहभागी घटक (स्टेक होल्डर्स) यांच्या क्रियाशील सहभागातून पुण्याच्या विकासाचा अजेंडा ठरवण्याची प्रक्रिया स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल व्यवहारांमुळे पुणेकरांच्या रोजच्या जगण्यात परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे, त्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करत आहोत.  पुणे शहरात झोपडपट्टी व कमी उत्पन्न गटाच्या परिसरात २०१८ पर्यंत १०० डिजिटल साक्षरता केंद्रे उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. पुणे शहरात मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याचे प्रमाण वर्षभरात सात टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर गेले असून ते ७० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती त्यांनी दिली. लोकांच्या सहभागाशिवाय आणि सरकारच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही शहर स्मार्ट होऊ शकत नाही, असे शेरॉन म्हणाले. तेल अिवव महापालिकेने संपूर्ण डिजिटलीकरणाच्या माध्यमातून तेथील नागरिकांच्या आयुष्यात घडवून आणलेल्या बदलाची माहिती त्यांनी दिली. लोकांना जोडून घेण्यासाठी निरनिराळ्या माध्यमांतून प्रयत्न केले तरच स्मार्ट सिटी प्रत्यक्षात येऊ शकेल, यावर त्यांनी भर दिला. गबी नेहम म्हणाले, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील देशात स्मार्ट व्हिलेज विकसित करताना अगदी पहिल्यापासून सुरुवात करावी लागली. कारण तिथे भुकेचा मूलभूत प्रश्नच मोठा होता. भारतात मात्र शेतीच्या बाबतीत चांगली स्थिती आहे.  ग्रामीण भागात शेती व इतर विषयांचे परंपरागत शहाणपण अफाट आहे. त्यामुळे इथल्या प्रश्नांचे वेगळे स्वरूप समजून घेऊन त्यावर तोडगे सुचविणारी स्मार्ट व्हिलेजची संकल्पना राबवावी लागेल.  

टीमवर्क हीच गुरुकिल्ली
इस्राईलमध्ये शेतकरी, सहकारी शेती संस्था, विस्तार-संशोधन-बाजारपेठ या क्षेत्रांतील सहभागी घटक एकमेकांच्या हातात हात घालून काम करत असल्याने मोठे यश मिळाले. भारतात शेतकऱ्यांना पीक उत्पादनाचे उत्तम ज्ञान अाहे. परंतु, शेती आणि समाज तुकड्या-तुकड्यांत विखुरला आहे. त्यामुळे पेरणी ते बाजारपेठ असा सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि टीमवर्क हीच स्मार्ट व्हिलेजची गुरुकिल्ली ठरेल, असे जोनाथन स्पेन्सर्स म्हणाले.

सहभागी व्हा
डीसीएफ राबवित असलेल्या स्मार्ट सिटी व स्मार्ट व्हिलेजच्या प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती बॉबी निंबाळकर यांनी दिली. विविध घटकांना या संकल्पनेत सहभागी होण्यासाठी या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com