पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सामान्यांना फटका; नांदेडमध्ये सर्वांत महाग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जुलै 2019

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेल दरवाढीची घोषणा केली. त्यामुळे पेट्रोल-डिझेल लिटरमागे सुमारे अडीच रुपयांनी महागले असून, राज्यातील दर नांदेडमध्ये सर्वांत जास्त आहेत. त्याखालोखाल परभणी जिल्ह्याचा क्रमांक लागतो. सामान्यांना मोठा फटका बसल्यामुळे इंधन दरवाढीला सर्व स्तरांतून विरोध केला जात आहे. 

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेल दरवाढीची घोषणा केली. त्यामुळे पेट्रोल-डिझेल लिटरमागे सुमारे अडीच रुपयांनी महागले असून, राज्यातील दर नांदेडमध्ये सर्वांत जास्त आहेत. त्याखालोखाल परभणी जिल्ह्याचा क्रमांक लागतो. सामान्यांना मोठा फटका बसल्यामुळे इंधन दरवाढीला सर्व स्तरांतून विरोध केला जात आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि रस्ते व पायाभूत सेवा उपकर लावण्याची घोषणा केली. अर्थसंकल्पातील या घोषणेनंतर राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव कडाडले आहेत. मुंबईत पेट्रोल 2.42 रुपये आणि डिझेल 2.50 रुपयांनी महागले. वेगवेगळ्या जिल्ह्यांत सरासरी अशीच दरवाढ झाल्यामुळे सामान्यांचे अंदाजपत्रकच कोलमडणार आहे. 

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडणार आहे. शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्‍टरचा आणि पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर होतो. त्यामुळे वाहतूकदारांप्रमाणे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे. 

- गौरव जाधव, नागरिक 

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक महागणार. परिणामी, अन्य वस्तूंचेही भाव वाढतील. ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होईल. 

- साहिल खान, कापड व्यापारी 

अर्थव्यवस्थेचा आधार मानल्या जाणाऱ्या रस्तेवाहतूक क्षेत्रावर इंधन दरवाढीमुळे कठीण वित्तीय संकट ओढवले आहे. हा अर्थसंकल्प रस्तेवाहतूक क्षेत्रासाठी उदासीन आणि निराशाजनक आहे. विदेशी उद्योजकांना भारतात आणण्यासाठी आणि भारतातील लहान उद्योजकांना संपविण्यासाठी सरकारने षड्‌यंत्र रचले आहे. 

- बल मलकीत सिंह, अध्यक्ष, ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेस 

शनिवारचे दर (रुपयांत) (कंसातील आकडे वाढ दर्शविते) 
जिल्हा पेट्रोल डिझेल 

नांदेड 80.34 (1.59) 70.53 (1.67) 
परभणी 80.29 (2.48) 70.47 (2.52) 
मुंबई 78.57 (2.42) 69.90 (2.50) 
पुणे 78.34 (2.27) 68.59 (2.36) 
नागपूर 78.54 (1.89) 68.81 (0.86) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens are in Tension due to Petrol Prices Hiked