विजबिलाच्या शंकांबाबत महावितरणने केला हा दावा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

अतिरिक्त भुर्दंड नसल्याची ग्वाही 
जूनच्या वीजबिलात लॉकडाऊनच्या कालावधीमधील (सुमारे 90 ते 97 दिवस) वीजवापरानुसार युनिट संख्या व बिलाची रक्कम नोंदविण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजवापराच्या युनिटला तीन महिन्यांत विभागून योग्य स्लॅब दरानुसार वीजबिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड लादलेला नाही, अशी ग्वाही महावितरणने दिली आहे. 

सोलापूर ः लॉकडाऊनच्या कालावधीमधील वीजवापराचे जून महिन्यात मीटर रिडींगप्रमाणे महावितरणकडून बिल दिले आहे. मात्र, या बिलाबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसात दाखल झालेल्या 8001 तक्रारींपैकी 7995 (99.92 टक्के) वीजग्राहकांच्या तक्रारींचे व शंकांचे जागेवरच निरसन करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. 

जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रिडींगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबती ग्राहकांमध्ये असलेल्या शंका निरसन व तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच गेल्या चार दिवसांमध्ये महावितरणकडून 164 व्हॉटस्‌ ऍप ग्रुप सुरु करण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये वीजबिलांबाबत योग्य माहिती तसेच ग्राहकांच्या शंका निरसनाचे काम सुरु आहे. सोबतच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन त्यांना वीजबिलाबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. तर येत्या 17 जुलैपर्यंत प्रत्येक उपविभागीय कार्यालयाकडून वीजग्राहकांसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 

याशिवाय जिल्ह्यात 90 ठिकाणी कोविड 19 च्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून मेळावे आयोजित करण्यात आले होते. यासह महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये दाखल झालेल्या एकूण 8001 तक्रारींमध्ये बार्शी विभागातील 2030, पंढरपूर 1164, अकलूज 4400, सोलापूर ग्रामीण 320 आणि सोलापूर शहर विभागातील 87 तक्रारींचा समावेश आहे. या तक्रारींच्या विश्‍लेषणानुसार मुख्यत्वे घरगुती ग्राहकांमध्ये वीजबिलांबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत होते. महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जूनच्या वीजबिलाची पूर्ण माहिती दिल्यानंतर या ग्राहकांचे शंका निरसन झाले. उर्वरित 6 तक्रारींमध्ये सदोष मीटर, रिडींग उपलब्ध नसल्याचे दिसून आले व त्यादेखील तक्रारी निवारणाची कार्यवाही सुरु झाली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This claim was made by MSEDCL regarding the doubts of Vijbila