‘क्‍लीन चिट’मुळे भाजप तोंडघशी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 डिसेंबर 2019

पाच वर्षांपासून होती टांगती तलवार
‘पवार यांना लवकरच जेलमध्ये टाकू,’ अशा वल्गना भाजपचे नेते वारंवार करीत होते. त्यामुळे अजित पवार यांच्या डोक्‍यावर सिंचन गैरव्यवहाराची मागील पाच वर्षांपासून टांगती तलवार होती.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन गैरव्यहारासंदर्भात क्‍लीन चिट मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिंचन गैरव्यहाराचे भूत अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या मानगुटीवर मागील पाच वर्षांपासून बसले होते. त्यामुळे पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करत राजकीय फायदा उठवण्याची संधी मागील पाच वर्षांत भाजपने सोडली नव्हती. लोकसभा, विधानसभा यापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने सिंचन गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करीत त्याचे राजकीय भांडवल केल्याचे स्पष्ट झाले होते.

‘नागरिकत्व दुरुस्ती’ येऊन ठेपली आता संसदेच्या वेशीवर 

या गैरव्यवहाराच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच पक्षाची बदनामी होत होती. याची पक्षाला किंमत मोजावी लागल्याचे ‘राष्ट्रवादी’चे नेते सांगतात. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने सिंचन गैरव्यवहारा हा प्रचाराचा मुद्दा करून राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला केल होता. त्यामुळे सत्तेवर आल्यावर पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार याची अटकळ बांधली जात होती. मात्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने सिंचन गैरव्यवहाराची हवाच निघाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजप तोंडघशी पडल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleanchit BJP Ajit Pawar Politics