#saathchal नद्यांची स्वच्छता ही प्रत्येकाचीच जबाबदारी

विलास काटे 
बुधवार, 3 जुलै 2019

आषाढी वारीच्या मार्गावरील नीरा नदीत माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. आज नीरा नदीचा प्रवाह सुरू होता. मात्र, अन्य दिवशी नदीची अवस्था पाहिली की मन खिन्न होते. माउलींच्या पादुकांना स्नान घालताना माझ्या मनात नदी स्वच्छतेचा विषय डोकावून गेला.

लोणंद -  आषाढी वारीच्या मार्गावरील नीरा नदीत माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. आज नीरा नदीचा प्रवाह सुरू होता. मात्र, अन्य दिवशी नदीची अवस्था पाहिली की मन खिन्न होते. माउलींच्या पादुकांना स्नान घालताना माझ्या मनात नदी स्वच्छतेचा विषय डोकावून गेला. फक्त सोहळ्याच्या दिवशी नाही, तर इतर दिवशीही नद्या स्वच्छ ठेवणे, हे समाजाचे कर्तव्य आहे, अशी भावना मिरजेतील स्थापत्य अभियंता ईश्वर सागवेकर याने व्यक्त केली.

माउलींच्या पालखी सोहळ्यात वासकर दिंडीत गेल्या तीन वर्षांपासून ईश्‍वर पायी वारी करीत आहे. तो सांगत होता की, ‘नीरास्नानाचा सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी आधी येऊन दत्त घाटावर थांबलो होतो. माउलींच्या पादुका रथातून उतरविल्यानंतर दर्शनासाठी धावणारे तसेच पुलावर थांबलेले भाविक पाहिले की माउलींचे वैभव अधोरेखित होते. मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळाप्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील हे पादुका हातात घेऊन दत्त घाटावर आले. ‘ज्ञानोबा-माउली’च्या जयघोषात पादुकांना स्नान घालण्यात आले. ‘‘नीरेत सोहळ्यासाठी पाणी सोडल्याने प्रवाह सुरू आहे. पण, संतांनी ज्यांना मानसन्मान दिला, त्या जननी असलेल्या नद्यांचे प्रदूषण दूर व्हायला हवे. राज्य सरकारने नद्या स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यायला हवा. ज्या पादुकांच्या दर्शनासाठी अवघा महाराष्ट्र वारीत सहभागी होतो, त्या पादुकांना स्नान घालण्याचे भाग्य लाभणाऱ्या नद्यांची अवस्था चांगली असली पाहिजे. नद्या पवित्र ठेवणे सर्वांचीच जबाबदारी आहे.’’ अशी भावना ईश्‍वरने व्यक्त केली.

आज पहिले उभे रिंगण
माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण बुधवारी (ता. ३) दुपारी चांदोबाच्या लिंबजवळ होणार आहे. पालखी सोहळा उद्या तरडगावला मुक्कामी असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleanliness of rivers is the responsibility of everyone