कोरोनाचा कहर त्यात महाराष्ट्रावर आले आहे 'हे' संकट

1c0f9336-b0e2-4a6b-9aa3-7d320acb729c.jpg
1c0f9336-b0e2-4a6b-9aa3-7d320acb729c.jpg

पुणे : मानवी हस्तक्षेपामुळे तसेच उद्योगिकीकरणामुळे राज्यातील सरासरी तापमानात वाढ होत आहे. दरम्यान यावर राष्ट्रीय तसेच राज्याच्या पातळीवर उपाययोजनांची कमतरतेमुळे प्राकृतिक आपत्ती, शेती उत्पन्न आणि पर्यावरणातील विविध जीवांवर याचा परिणाम होत असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.

याबाबत माहिती देताना 'समुचित एनवायरो टेक'च्या (एसएटी) संस्थापक संचालिका डॉ. प्रियदर्शिनी कर्वे म्हणाल्या, "देशातील औद्योगिकीकरणात महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी राज्याची ओळख आहे. देशाच्या हरितगृह वायू उत्सर्जनात 9 टक्के उत्सर्जन हे राज्याचे आहे. त्यामुळे राज्याच्या तापमानात देखील वाढ होत आहे. यासाठी हरितगृह वायू उत्सर्जनाला कमी करण्यास किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणणे गरजेचे आहे. यासाठी कृती आराखड्याच्या वापर केला जाऊ शकतो. विविध राज्यांच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील डेटाच्या आधारावर हा आराखडा तयार केला जातो. मात्र या आराखड्याची माहिती सर्व क्षेत्रांमध्ये पोहोचत नसल्याने त्या-त्या विभागामार्फत योग्य उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रशासनाने, प्रशासकीय विभाग, उद्योग क्षेत्र, धरणांची व्यवस्थापन करणारी यंत्रणा, कारखानदारी, कृषी विभाग सारख्या क्षेत्रांतील संबंधितांमध्ये या अरखड्याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांगीण प्रयत्न होतील व उपाययोजना करणे सोपे होऊ शकेल."

जागतिक पातळीवर 360 अब्ज टन पेक्षा जास्त कार्बनचे उत्सर्जन झाल्यावर जागतिक तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढ होईल. प्रत्येक वर्षी जागतिक स्तरावर 42 अब्ज टन कार्बनचे उत्सर्जन होत आहे. यामध्ये भारताचा सुमारे सात अब्ज टन उत्सर्जनाचा वाटा असून यात महाराष्ट्र राज्यातून सर्वाधिक उत्सर्जन होत आहे. त्यामुळे राज्याच्या तापमानातही वाढ होत आहे. तर पॅरिस कराराप्रमाणे 2030 पर्यंत 30 टक्क्यांनी हे उत्सर्जन कमी केले जाणार असून अद्याप यासाठी राष्ट्र किंवा राज्याच्या पातळीवर कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. यासाठी प्रशासनाने उद्योग आणि सरकारी प्रकल्पांच्या माध्यमातून दरवर्षी किती उत्सर्जन होत आहे तसेच कार्बन शोषून घेण्यासाठी काय प्रयोग केले जात आहेत. याची आकडेवारी जाहीर केली पाहिजे. तसेच आर्थिक बजेटप्रमाणे कारबन बजेटचीही सुरुवात केली पाहिजे.- अनुपम सराफ, पर्यावरण अभ्यासक

तापमानातील वाढीमुळे हवामान बदलाचा परिणाम :
- ऋतू चक्रातील बदल
- ध्रुवीय भागाचे बर्फ वितळणे
- समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ
- प्राकृतिक आपत्तींच्या संख्येत वाढ
- आरोग्याशी संबंधित विविध आजारांचा धोका
- प्राणी, पक्षी व वनस्पतींच्या विविध प्रकारच्या प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर
- शेती उत्पन्नात घट, पाण्याच्या उपल्ब्धतेत ताण
- दुष्काळ आणि पूर परिस्थितीमध्ये वाढ

तापमानातील वाढ कमी करण्यासाठीच्या उपाययोजना
- खनिज व जैविक इंधनांचा वापर कमी
- पर्यावरणातील कार्बन कमी करण्यासाठी वृक्षारोपण
- कचरा व्यवस्थापनातील तंत्राच्या माध्यमातून सुद्धा कार्बन धरून ठेवणे शक्य
- बदलत्या वातावरणाला समजून घेत त्याप्रकारे धोरणांना आखणे
- आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांमध्ये बदल
- प्रशासनाबरोबर सामन्यांमध्ये जनजागृती करणे

हरितगृह वायू उत्सर्जन (कार्बन डायऑक्साईड व्यतिरिक्त इतर वायू)
वायू : पर्यावरणात राहण्याचा कालावधी (वर्षांमध्ये)
मिथेन : 12.4 वर्षे
नायट्रोजन ऑक्साईड : 121 वर्षे
हायड्रोफ्लोरोकारबन (एचएफसी) : 13.4 वर्षे

(Edited by Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com