पशू-पक्ष्यांची विक्री त्वरित बंद करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई - केवळ क्रॉफर्ड मार्केटच नव्हे, तर मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाळीव पशू-पक्ष्यांची बेकायदा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर उच्च न्यायालयाने हा धंदा बंद करण्याचे आदेश गुरुवारी (ता. 4) दिले. 

मुंबई - केवळ क्रॉफर्ड मार्केटच नव्हे, तर मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाळीव पशू-पक्ष्यांची बेकायदा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर उच्च न्यायालयाने हा धंदा बंद करण्याचे आदेश गुरुवारी (ता. 4) दिले. 

दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून विनापरवाना चालणारा पशू-पक्ष्यांचा बाजार बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते, तरीही तो सुरू असल्याचे पुरावे उच्च न्यायालयात सादर करण्यात आले. बंद दुकानांबाहेर पशू-पक्ष्यांची खरेदी-विक्री कशी केली जाते, याचे चित्रणही न्यायालयाने नेमलेल्या समितीने सादर केले. हा बाजार कुर्ला व बोरिवली परिसरातही वाढल्याचे समितीने न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले. त्यावर केवळ क्रॉफर्ड मार्केटच नव्हे, तर संपूर्ण मुंबईत बेकायदा चालणाऱ्या पशू-पक्ष्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

पशू-पक्ष्यांची विक्री करणारी दुकाने पुन्हा सुरू होणार नाहीत याची दक्षता पालिका प्रशासन व पोलिसांनी घ्यावी, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाचे आदेश धुडकावून हा धंदा सुरू असल्याचे पुरावे पाहिल्यानंतर खंडपीठाने आश्‍चर्य व्यक्त केले आणि याबाबत शुक्रवारी (ता. 5) अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले. 
एका सेवाभावी संस्थेने मुंबईतील पाळीव पशू-पक्ष्यांच्या बेकायदा विक्रीविषयी याचिका दाखल केली आहे. दुकानदार पशू-पक्ष्यांवर अत्याचार करतात. त्यांना छोट्या छोट्या पिंजऱ्यात बंद करून ठेवले जाते. पाळीव प्राण्यांच्या पिल्लांनी डोळे उघडण्यापूर्वीच त्यांच्या आईपासून हिरावून, गुंगीचे औषध देऊन त्यांची विक्री करण्यात येते, असे आरोप याचिकाकर्त्यांनी केले होते.

Web Title: Close the sale of animal-bird immediately