सोलापूर जिल्ह्यातील 23 शाळा बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

- साडेसात हजारांनी घटली पटसंख्या 
- 230 शिक्षक झाले अतिरिक्‍त 

सोलापूर : मागील दोन-तीन वर्षांत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. 2016-17 च्या तुलनेत यंदा साडेसात हजारांनी पटसंख्या घटल्याने 23 शाळा कमी झाल्या असून, 230 शिक्षकांना अतिरिक्‍त व्हावे लागले आहे. 

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षण हा पाया असतो. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी वर्ग-1चे अधिकारी झाले आहेत. तसेच अनेक जणांना शासकीय नोकरीही मिळाली आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकविण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून ठोस नियोजनाची अपेक्षा आहे. जेणेकरून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पालकांना खात्री होईल आणि पटसंख्या वाढेल. मात्र, ब्लेझर की ड्रेसकोड यामध्येच प्रशासनाला रस असल्याचे मागील काही महिन्यांपासून पहायला मिळाले. दरम्यान शिक्षक व प्रशासन यांच्यातील वादही लोकांनी पाहिला.

गतवर्षीच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या सुमारे सात हजारांनी घटली असून, ही चिंतेची बाब आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी याकरिता आगामी वर्षात ठोस नियोजन करण्यात येईल. जेणेकरून शिक्षकांवर अतिरिक्‍त होण्याची वेळ येणार नाही. - संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक 

Web Title: Closing of 23 schools in Solapur district