राज्यात 16 जुलैपासून दूध संकलन बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे - दुधाला योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना "करेंगे या मरेंगे' अशी भूमिका घेणार आहे. दूध उत्पादक अडचणीत असताना राज्य सरकारने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, त्यामुळे 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येईल. तसेच, मुंबईसह राज्यात होणारा दूधपुरवठा रोखण्यात येणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. 

पुणे - दुधाला योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना "करेंगे या मरेंगे' अशी भूमिका घेणार आहे. दूध उत्पादक अडचणीत असताना राज्य सरकारने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, त्यामुळे 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येईल. तसेच, मुंबईसह राज्यात होणारा दूधपुरवठा रोखण्यात येणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. 

खासदार शेट्टी म्हणाले, ""दूध दराच्या प्रश्‍नावर खासगी आणि सहकारी दूध संघांच्या प्रतिनिधींनी सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कल्पना दिली होती; परंतु सहा महिन्यांनंतरही सरकारने उपाययोजना केल्या नाहीत. ऊस आणि दूध दराच्या प्रश्‍नावर पुण्यात नुकताच मोर्चा काढण्यात आला; परंतु सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे येत्या 16 जुलैपासून दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार आहे.'' 

""राज्य सरकारने प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र, अनुदान देऊनही दुधाच्या दरात दोन रुपयांनी घट झाली. गाईच्या दूध उत्पादनाचा खर्च प्रतिलिटर 35 रुपये आहे. परंतु दूध उत्पादकांना प्रतिलिटर 17 ते 18 रुपये दर मिळत आहे. त्यापेक्षा पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त आहे. अशा परिस्थितीत दुधाचा व्यवसाय कसा करणार,'' असा प्रश्‍न शेट्टी यांनी केला. 

शेट्टी म्हणाले... 
- आंदोलनादरम्यान दूध रस्त्यावर ओतण्याऐवजी घरी वापरू किंवा वासरांना पाजू. 
- शालेय पोषण आहारात शाळांमध्ये वाटणार आहे. 
- कर्नाटकच्या धर्तीवर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावे. 
- दुधाचे दर स्थिर होत नाहीत, तोपर्यंत अनुदान द्यावे. 
- दूध पावडर खरेदी करून त्याचा बफर स्टॉक करावा. 
- आंदोलनाच्या कालावधीत परराज्यांतील दुधाला बाजारपेठ उपलब्ध होऊ देणार नाही. 
- कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरातच्या सीमेवर दूध अडविण्यात येईल. 
- दराबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. 

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने या वर्षी उसाच्या एफआरपीची शिफारस 9.50 टक्‍क्‍याला दोन हजार 750 रुपये केली असून, पुढील एक टक्‍क्‍याला 289 रुपये आहे. मात्र, पंतप्रधानांकडून साखर कारखानदारांच्या हितासाठी या शिफारशींमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या धोरणाला आमचा विरोध राहील. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींनुसार शेतमालाला भाव द्यावा. 
- राजू शेट्टी, खासदार 

Web Title: Closing of milk collection from July 16 in the state