Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांनी केले मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये १२, तर शासकीय नोकर्‍यांमध्ये १३ टक्के आरक्षण मिळणार, यावर शिक्कामोर्तब झाले. 

मुंबई : मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळल्या. आणि मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये १२, तर शासकीय नोकर्‍यांमध्ये १३ टक्के आरक्षण मिळणार, यावर शिक्कामोर्तब केले. 

यानंतर समाजाच्या विविध स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. या निर्णयावर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या.  

सरकार महत्त्वाची लढाई जिंकली : मुख्यमंत्री
राज्य सरकारने तयार केलेल्या कायद्याला आज यश आले असून, सरकार महत्त्वाची लढाई जिंकली आहे. या आरक्षणासाठी लढाई लढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा, मंत्रिगट, खासदार संभाजीराजे यांचे विशेष आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणाही दिल्या. मराठा बांधवांच्या लढ्याला हे यश मिळाले आहे. तसेच या सर्व प्रक्रियेत मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल दिला, त्या अहवालाने सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आरक्षण टिकलं हे महत्त्वाचं : संभाजीराजे छत्रपती
मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारने केलेले प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले. मिळालेले आरक्षण हे १६ की १२ टक्के आहे, हा मुद्दा महत्त्वाचा नसून आरक्षण टिकले, हे महत्त्वाचे आहे. मराठा समाजाने आरक्षणाबाबतच्या या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी 'आरक्षण गेलं खड्ड्यात' असे ट्विट केले होते. संताप व्यक्त करण्यासाठी मी असे ट्विट केले होते, परंतु विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेवर आपण आजही ठाम आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिल्याने आनंदित : भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, ''ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, ही भावना होती. ती मान्य केली गेली. त्यामुळे मी आनंद व्यक्त करतो''. 

मराठा आरक्षणाचा न्यायालयाचा निर्णय चांगला : अण्णा हजारे
मराठा आरक्षणाचा निर्णय चांगला असून आता सरकारला उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करून त्याची अंमलबजावणी करावीच लागेल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावर व्यक्त केले. 

मराठा आरक्षण पूर्णपणे असंवैधानिक : अॅड. सदावर्ते

मराठा आरक्षण हे पूर्णपणे असंवैधानिक असून आम्ही त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षण कायद्याला मंजुरी मिळावी, यासाठी सरकारने न्यायालयावर दबाव आणला. फडणवीस सरकारने यामध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केला आहे. न्या. रणजित मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाने माझी आणि जयश्री पाटील यांची याचिका ऐकून घेण्यास नकार दिला. हा न्यायालयीन शिस्तीचा भंग असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

तसेच विनोद तावडे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या निर्णयाचे स्वागत केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM and other political leaders welcomes decision on Maratha reservation